साताऱ्यात शिरोमणी सावतामाळी रयत बाजाराचा शुभारंभ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विकेल ते पिकेल हे अभियान राज्यात राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, बाजार पेठ, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांबरोबर ग्राहकांना होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

विकेल ते पिके या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अण्णासाहेब कल्याणी शाळे समोरील मैदानात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे,  जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, कृषी उपसंचालक  विजयकुमार राऊत, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

 विकेल ते पिकेल अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागांच्या तसेच सहकार, पणन, नाबार्ड इत्यादी विभागांच्या विविध योजनांची सांगड घालण्यात येणार असून विविध योजनांतर्गत शेतकरी गटांना त्यांच्या शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून दिलासादायक काम केले. आज नवीन पिढी शेती करत असून विविध प्रयोग करीत आहेत. शेतकऱ्यांची पिकावलेला मालाला चांगला भाव व बाजार पेठ मिळावी यासाठी विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती होईल, असा विश्वासही पालकमंत्री यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

error: Content is protected !!