‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या आणि राज्यासह कर्नाटक राज्यात शाखा विस्तार असलेल्या सातार्‍याच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार व चेअरमन पदी डॉ. अनिल पाटील यांची आज फेरनिवड झाली. 

संस्थेचे सचिव म्हणून वाशी, नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर यांची निवड झाली.
लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी झाल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, विश्‍वजित कदम, हणमंतराव गायकवाड, रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यात उपाध्यक्षपदी आमदार चेतन तुपे, जयश्री चौगुले, गणपतराव देशमुख, अरुण कडू आणि एन. डी. पाटील यांची निवड करण्यात आली.
रयत’च्या या पदाधिकार्‍यांची आगामी तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. कर्मवीर पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 9 मे रोजी या निवडी केल्या जातात. सातारा जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट’ असण्याचा तो काळ असल्याने यावेळी पदाधिकार्‍यांच्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आजच्या सभेस डॉ. अनिल पाटील यांच्यासह सर्व जनरल बॉडीचे सदस्य उपस्थित होते.
error: Content is protected !!