सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होण्यामागे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्यावतीने राज्यात ठीकठीकानी कोरोनाचे नियम पाळून आंदोलने करण्यात येत आहेत. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथील निवासस्थानी कुटुंबासमवेत आंदोलन केले. तर सातारा जिल्हा रयत क्रांती युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी शिवथर, ता.सातारा येथील निवासस्थानी आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
‘ मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधले काठीला ‘….’महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला ‘…अशा घोषणा देत ह्यावेळी महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्य सरकारचा रयत क्रांती संघटनेने निषेध केला. दरम्यान, ह्यावेळी सातारा येथे झालेल्या आंदोलनावेळी बोलताना प्रकाश उर्फ सोनू साबळे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणीसाठी राज्यात ५८ मोर्चे काढण्यात आले. अनेक युवकांनी आरक्षणासाठी स्वतःचा बळी दिला. त्यामुळे अखेर ७० वर्षात प्रथमच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, नुकत्याच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला. गायकवाड आयोगाने मोठ्या कष्टाने वास्तविक अहवाल न्यायलयाला समजून सांगण्यात राज्य सरकार कमी पडले. वास्तविक राज्यातील सरकार हे प्रस्थापित लोकांचे सरकार आहे. त्या सरकारमध्ये असलेल्या प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना विस्थापित मराठा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येवू द्यायचा नाहीये. येथील गरीब मराठा समाजाचे युवक बेरोजगार रहावे तसेच गरीब मराठा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत राहाव्यात, अशीच राज्य सरकारची इच्छा असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळेच न्यायलायचा निर्णय आल्यानंतरही आघाडीचे सर्वोच्च नेते बोलायला तयार नाहीत. त्यांच्या ह्या कृतीच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई पुढे सुरूच ठेवण्यासाठी रयत क्रांतीने आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन हाती घेतले असल्याचे साबळे यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.