सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सापत्न वागणूक देत असून राज्यात एकत्र असलेले पक्ष जिल्ह्यात मात्र एकमेकांना विश्वासात घेत नाहीत अशी तक्रार शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कानावर घातली आहे. त्यामुळे साताऱ्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची होणारी घुसमट समोर आली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून आता जिल्हा बँकेतही शेखर गोरे यांच्या रुपाने शिवसेनेने प्रवेश केला आहे. त्याबद्दल आज शेखर गोरे यांचा आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात हा शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कुरापती आदित्य ठाकरे यांच्या कानावर घातल्या. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार महेश शिंदे, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि जिल्ह्यातील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेखर गोरे म्हणाले, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीने भाजपला बरोबर घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात व मतदारसंघात शिवसेना आपली ताकद वाढवत असताना मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कुटील कारस्थानं करत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात एकत्र सत्तेत असताना जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला विश्वासात घेत नाही. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री,आमदार, पदाधिकारी आम्ही बँकेत कार्यक्रमाला गेलो नाही. आम्ही विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
You must be logged in to post a comment.