मराठा समाजात असंतोष घडवण्यासाठीच कर्मचाऱ्यांची कपात : नरेंद्र पाटील

मंगेश मोहिते यांची बदली करण्यासह कार्यमुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा):राज्यातील मराठा समाजामध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (M.D.) मंगेश मोहिते यांनी जाणीवपूर्वक महामंडळाचे तब्बल ६१ कर्मचाऱ्यांची कोणतीही कल्पना न देता कपात केल्याने तीव्र नाराजी व्यक्त करुन त्यांचे विरोधात महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी भवन, नवी मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. श्री.मोहिते यांची अन्यत्र बदली करावी व कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावे अशी मागणी ही नरेंद्र पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाबरोबरच मराठा समाजाला उद्योजक बनविण्याकरीता ज्या विविध योजना आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे फार मोठे योगदान असल्याचा नरेंद्र पाटील यांनी उल्लेख करून पत्रकार परिषदेत श्री.पाटील पुढे म्हणाले की, आज राज्यामध्ये जवळपास ९२,४९५ लाभार्थी संख्या असून, त्यांना ७,२०१ कोटीपर्यंत बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. त्या कर्जापोटी व्याज स्वरुपात जवळपास ७८० कोटीचा व्याज परतावा महामंडळाकडून करण्यात आला आहे. हे महामंडळ पूर्णतः ऑनलाईन पध्दतीने काम करीत असून, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना कर्ज न देता व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना बँकेकडून कागदपत्राची संपूर्ण पाहणी व तपासणी करुनच बँकामार्फत कर्ज दिले जाते व त्या कर्जावरील १२ टक्क्यांपर्यंत व्याज हे महामंडळमार्फत दिले जाते.

सदरील ही संपूर्ण प्रक्रिया करण्याकरीता महामंडळामध्ये विभाग, जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर कंत्राटी स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी योग्य पध्दतीने काम करुन घेणे हे प्रशासकीय प्रमुख म्हणुन व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांची जबाबदारी असूनही प्रत्यक्षात त्यांचेकडुन या सर्व बाबींकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बाब त्यांनी आज निदर्शनास आणून दिली. तसेच नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, माझी या महामंडळावर अध्यक्ष म्हणुन नेमणुक होण्यापूर्वी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडुन कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व दिरंगाई आढळून येत होती, लाभार्थ्यांना योग्य वागणुक मिळत नव्हती, जाणीवपूर्वक लाभार्थ्याचे प्रकरण प्रलंबित ठेवली जात होती, वेळेवर व्याज परतावा अदा होत नव्हता, लाभार्थ्यांची दिशाभूल केली जात होती, लाभार्थ्यांना योग्य माहिती मिळत नव्हती, विभागीय समन्वयक यांचेकडून आलेल्या ई-मेल ला वेळेत उत्तर दिली जात नव्हते, रिकन्सलेशन्स प्रक्रिया होत नव्हती, योग्य वेळेत ऑडिट होत नव्ह,ते संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची कित्येक महिने कार्यवाही होत नव्हती, बँकांसोबत समन्वय होत नव्हते, ज्या बँकांकडुन कर्ज दिले जात नाही अशा बँकांसोबत चर्चा होत नव्हती, लाभार्थ्यांना व्यवसायाच्या दृष्टीकोनातुन मदत होत नव्हती इ. गोष्टी होत असताना कर्मचाऱ्यांवर योग्य पध्दतीने प्रशासकीय अंकुश ठेवणे ही जबाबदारी मुख्यतः महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची असताना त्यांचेकडुन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

जिल्हास्तरावर योग्यरित्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहीजे, लाभार्थ्यांना व्याज परतावा त्वरीत मिळाला पाहिजे, तसेच तालुका, गांव स्तरापर्यंत गरजु मराठा नागरिकांपर्यंत योजना पोहचली पाहिजे व त्यांना योजनेमार्फत उद्योजक होण्यासाठी मदत व्हावी, यासाठी महामंडळामार्फत जिल्हा व मुख्य कार्यालय स्तरावर अधिकच्या कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली होती. परंतु व्यवस्थापकीय संचालक यांच्या कामातील अनियमितता संचालक मंडळाच्या बैठकीत उघड केल्यामुळे व मराठा समाजात राज्य सरकारच्या विरोधात हेतुपुरस्सर असंतोष निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक ६१ कर्मचाऱ्यांची कोणतेही स्पष्ट कारण न देता अचानकपणे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विश्वासात न घेता कपात केल्याचे सांगितले.

यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची कामे वेळेवर न होणे, व्याज परतावा वेळेवर न मिळणे अशा अनेक प्रकारच्या दिरंगाई होणाऱ्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश मोहिते यांची तातडीने इतर विभागामध्ये शासनामार्फत बदली करुन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यक्षम, अभ्यासु अशा अधिकाऱ्याची नेमणुक करुन, कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजु करुन घेण्याची या पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली. त्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगून शेवटी राज्यभर दौरे करुन लवकरच एक लाख मराठा उद्योजकांचा टप्पा गाठणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!