सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): आम्ही नेमके कार्यकर्ते आहोत की राज्यकर्ते, ह्या प्रश्नावर चिंतन करण्यासाठी आणि आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने महत्वाची भूमिका बजावण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे २७ ऑगस्ट रोजी साताऱ्यात पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले कार्यकर्त्यांना यावेळी महत्वाचे मार्गदर्शन करणार असून कार्यकर्त्यांची मते आणि अडचणीदेखील ना. आठवले जाणून घेणार आहेत, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व सातारा जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता मेळावा आयोजनाची बैठक सोमवारी सातारा विश्रामगृहात करण्यात आली होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अशोक गायकवाड बोलत होते. यावेळी मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे, जेष्ठ नेते अप्पासाहेब गायकवाड, युवा नेते नितेश गाडे आदी उपस्थित होते.
२७ ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या भव्य सभागृहात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० यावेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातून पहिल्या फळीतील तब्बल अडीच हजार रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अधिक गतिमान करण्यासाठी आणि शासनकर्ते कार्यकर्ते निर्माण करणे हा मेळाव्याचा उद्देश असून रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत गेला असला तरी त्यांचा विचार न स्वीकारता त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना असलेली शिस्त रिपब्लिकन कार्यकर्त्यांना लागली पाहिजे. तसेच कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. मेळाव्यात कार्यकर्ता नेमका कसा असावा ? पक्षाचे नेमके धोरण काय ? ह्याबाबत मेळाव्यात उहापोह केला जाणार असून यावेळी महत्वाची बाबा म्हणजे प्रत्येक कार्यकत्यांनी मते आणि अडचणी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले जाणून घेणार आहेत. मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली असून सातारा शहर ना.रामदास आठवले आणि पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असल्याचे अशोकराव गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
You must be logged in to post a comment.