सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने निर्बंध उठवले आहेत. तब्बल दोन वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडानंतर साताऱ्यात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार दि .१८ रोजी साताऱ्यात होत आहे. या हिल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह सात हजार पाचशे स्पर्धक सहभागी झाले आहेत.त्यामुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय झाले असुन स्पर्धेच्या किट एक्स्पोचा शुभारंभ शेंद्रे येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या सभागृहात संपन्न झाला. या एक्सपोला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
गेल्या दहा वर्षांपासून साताऱ्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशातील धावपटू आतुरतेने वाट पाहत असलेली ”सातारा हिल हाफ मॅरेथॉन” स्पर्धा यंदा ”फिटनेस जिंदाबाद” हे घोषवाक्य घेऊन आयोजित केली आहे. १८ सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील विविध गटांतील हौशी स्पर्धकांना सहभाग मिळावा, यासाठी संयोजकांनी सर्वांत अगोदर नावनोंदणीची संधी दिली आहे.शनिवारी साताऱ्यात धावपट्टू दाखल झाले. अनेक धावपट्टूंनी सायंकाळच्या सत्रात सराव केला. पोलीस कवायत मैदान ते यवतेश्वर पठार या दरम्यानचा नैसर्गिक धाव मार्ग स्पर्धकांचा दमसासाची परीक्षा घेतो.यंदाही ते चित्र पहायला मिळणार आहे. येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मल्टिपर्पज हॉलवर किट वाटप एक्सो सोहळा रंगला. याचे उद्घाटन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. या वाटप सोहळ्यात सहभागी खेळाडूंना मॅरेथॉन कीट वाटप करण्यात आले. यंदा सातारा हिल मॅरेथॉनचा उत्साह जास्त जाणवत आहे, अशी माहिती मॅरेथॉनच्या संयोजिका डॉ. सुचित्रा संदीप काटे यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे स्पर्धेत खंड पडला होता. मात्र, यंदा नव्या जोमाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून प्रचंड मागणी असल्याने केवळ काही तासांतच सर्व नोंदणी पूर्ण झाली. दरम्यान,गेल्या दोन वर्षांत यवतेश्वर घाटातील रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरणामुळे मॅरेथॉनच्या मार्गावरील रस्ते प्रशस्त झाले आहेत.
सातारा शहरामध्ये दि. 18 सप्टेंबर रोजी हिल हाफ मॅरेथॉन -2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पोलीस परेड ग्राऊंड येथून सुरुवात होवून पोवई नाका-मरीआई कॉम्प्लेक्स-शाहु चौक-अदालत वाडा रोड मार्गे-समर्थ मंदिर-बोगदा-यवतेश्वर-प्रकृती हेल्थ रिसॉर्ट पासून वळून परत त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राऊंड अशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे ७ ते ८ हजार स्पर्धक भाग घोणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.तरी स्पर्धक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतूकीचे नियम व वाहनाचे पार्किंग करण्यासाठी पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार दि.१८ सप्टेंबर २०२२ चे स. ५ वा. पासून सकाळी १० वा. पर्यंत या कालावधीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरता बदल
मुख्य बसस्थानक –राधिका सिग्नल-तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने सातारा शहराच्या बाहेर जातील.सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी-जाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी सर्व वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट बाजु कडून सातारा बाजूकडे येणार नाहीत. ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा-एकीव-मोळेश्वर-कुसुंबीमुरा-कुसुंबी-मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील.
पार्किंगची सोय
हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेकरिता येणारे स्पर्धकांनी व नागरिकांनी आपली वाहने ही प्रशासकीय इमारतीच्या समोरील मोकळ्या मैदानामध्ये, कलेक्टर ऑफिस ते जिल्हा परिषद ग्राऊंड रस्त्यांचे दोन्ही बाजुस, जुना आर. टी. ओ. चौक ते सुभाषचंद्र बोस चौक, करंजेनाका जाणारे रोडवर दक्षिण बाजुस लावतील.तरी वरील वाहतूकीतील बदलाची नागरिकांनी व वाहन चालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.