सेवानिवृत्त नागरिक हा समाजाचा अमूल्य ठेवा : यशेंद्र क्षीरसागर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सेवा कधीही संपत नसते. सेवानिवृत्त नागरिक हा राष्ट्राचा खूप मोठा ठेवा आहे. त्यांचे अनुभव आणि त्यांची सेवा यांची शिदोरी त्यांनी समाजाला प्रदान करावी. त्यातून समाजाचे प्रबोधन आणि दिशादर्शन होईल, असे प्रतिपादन कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

वाई तालुक्यातील बोपेगाव येथील निवृत्त वनाधिकारी रत्नकांत शिंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी श्री .शिंदे यांचे सर्व कुटुंबीय, पत्नी सौ. नंदा शिंदे, सर्व मुले, जावई पाहुणेमंडळी तसेच गावातील नेते मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.क्षीरसागर म्हणाले,” प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होताना मन कृतार्थ होते,हे निश्चित आहे .परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे की; जीवनभर आपल्याला मिळालेले भले-बुरे अनुभव समाजाला सेवानिवृत्तांनी जमेल त्या पद्धतीने द्यावे. त्यातून नव्या पिढीला प्रबोधन होईल. काय करावे आणि काय करू नये ,तसेच जीवन सफल कसे बनवता येईल; याचे दिशादर्शन समाजाला होईल. खडतर परिश्रमातून तसेच; अपमान, अवहेलना सहन करीत अनेकांनी संघर्ष करून यश मिळवलेले असते. हा सर्व अनुभव समाजाला कथन केल्यास त्यातून जे मंथन होईल त्यामुळे सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यास मोलाची मदत मिळेल. संत, समाजसेवक, समाजसुधारक यांच्या विषयी वाचावयाचे राहून गेले असल्यास छान दर्जेदार वाचन करावे. समाजातील विविध घटकांनी देखील सेवानिवृत्तांची काळजी घ्यावी .त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करावा आणि समाज शिक्षण प्राप्त करावे.श्री. शिंदे यांनी प्रचंड कष्टातून सेवा तर मनोभावे केलीच .परंतु त्यासोबत समाजकार्य देखील अत्यंत मनापासून केले आणि करीत आहेत. आपल्या मुलांना घडवले. त्यांचा आदर्श आणि संघर्ष नव्या पिढीतील मुलांनी नव्हे तर सर्वच तरुणांनी संपूर्ण समाजाने घ्यावा.”

यावेळी श्री. शिंदे यांच्यावर प्रेम करणारे सर्व स्नेही, सर्व कुटुंबीय उपस्थित होते. अनेक वक्त्यांनी श्री. शिंदे यांचे गुणवर्णन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस अधिकारी आणि श्री.शिंदे यांचे जावई श्री.हनमंत क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!