सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेसमोरील कल्याणी इस्टेटमध्ये सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी सुरू असलेल्या खोदकामात रायफलीच्या १ हजारहून अधिक काडतुसांचा साठा सापडला आहे. ही काडतुसे कोणत्या काळातील आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, त्यादृष्टीने ती पुरातत्व विभागाकडे दिली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी अण्णासाहेब कल्याणी यांची मालकी असलेला हा संपूर्ण परिसर कल्याणी इस्टेट म्हणून ओळखला जातो. उद्योगपती बाबा कल्याणी यांनी अलीकडेच सातारा नगरपालिकेच्या इमारतीसाठी ही जागा नाममात्र मोबदल्यात दान दिली आहे. या ठिकाणी इमारतीच्या बांधकामासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू असताना आज दुपारी एकच्या सुमारास जेसीबीच्या दाताला दीड ते दोन फूट खोलीवर लोखंड लागल्याचे जाणवले. त्यामुळे हळुवारपणे वरवरची माती बाजूला केली असता गंजलेल्या अवस्थेतील बॅरलसारख्या वस्तूमध्ये रायफलीची हजारावर काडतुसे आढळून आली. त्याच्याशी संबंधित काही साहित्यही आढळले. हे सर्व साहित्य गंजलेल्या अवस्थेत आहे.
You must be logged in to post a comment.