माहितीच्या अधिकाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे : गटविकास अधिकारी किशोर माने

कोरेगाव,(भूमिशिल्प वृत्तसेवा): “माहितीचा अधिकार हा देशपातळीवरील अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. जनता, प्रशासन यांच्यामधील विश्वास अधिक दृढ व्हावा आणि प्रशासनातील पारदर्शकता अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचावी या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा आहे .त्याचा सकारात्मक विचार करून अंमलबजावणी व्हावी,”असे प्रतिपादन कोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले.

माहितीचा अधिकार दिनानिमित्त येथील पंचायत समितीमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे ,पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील ग्रामसेवक या कार्यशाळेस उपस्थित होते.श्री.माने यांनी यावेळी आपल्या मनोगतात आणि दीर्घ सादरीकरणात माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची विविध कलमांसह सोदाहरण माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले,”१२ ऑक्टोबर २००५ पासून माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या संकल्पनेतून हा कायदा अस्तित्वात आला. प्रशासनाने या कायद्याकडे सकारात्मक दृष्ट्या पाहणे अपेक्षित आहे. जनतेला जी माहिती हवी आहे ,ती योग्य वेळेत ठरवून दिलेल्या दिवसांमध्ये पोहोचावी.ही माहिती देत असताना सर्व नियमांचे पालन करावे.खूप जास्त कागदपत्रांची माहिती मागितली असल्यास मागणी करणाऱ्या नागरिकास कार्यालयात बोलावून ‘अभिलेख अवलोकन’ करण्याची देखील तरतूद नियमांमध्ये आहे. वैयक्तिक माहिती देता येत नाही. असे असले तरी,’ ही माहिती का देता येत नाही’ याबाबत माहिती मागणाऱ्या नागरिकाचे नम्रतेने शंकानिरसन करावे.

प्रशासन आणि जनता यांच्यामधील विश्वासाचे नाते अधिकाधिक दृढ होण्यासाठी हा कायदा निर्माण करण्यात आला आहे त्यामुळे नकारात्मक दृष्टीने विचार न करता कायद्याच्या चौकटीत राहून मागविण्यात आलेली सर्व माहिती जन माहिती अधिकाऱ्यांनी प्राप्त करून वेळेत पोहोचवावी.वेळेत माहिती न गेल्यास त्याचे परिणाम सर्वांनाच सहन करावे लागतात.अशी प्रकरणे अपिलात जातात.अपिलात गेल्यावर सुद्धा वेळेचे बंधन पाळावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी वेळेत माहिती देत असतानाच माहिती ज्याने मागवली आहे त्याच्याशी सौहार्दाचे वातावरण ठेवून माहिती पूरवावी.

माहिती देण्यासाठी कोणत्याही प्रकारची टाळाटाळ अथवा विलंब करू नये. ज्यांना माहिती द्यावयाची आहे त्यांना या प्रक्रियेतील सर्व नियमांची ओळख करून द्यावी जेणेकरून माहिती मागणारे आणि प्रशासन यांच्यामध्ये कोणताही आकस अथवा न्यूनगंड राहणार नाही.” माहितीच्या अधिकारासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेली माहिती पुस्तिका अत्यंत उपयोगी असून तिच्या आधारे माहितीच्या अधिकाराचा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बारकाईने अभ्यास करावा ,असेही आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्या शंकांचे निरसन श्री.माने यांनी केले. पंचायत विस्तार अधिकारी श्री.संजयकुमार बाचल यांनी स्वागत केले आणि आभार मानले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री.अक्षय चांदेकर ,श्री. तुषार भोईटे यांनी तांत्रिक सहाय्य केले. पंचायत विस्तार अधिकारी श्री. संजयकुमार बाचल यांनी स्वागत केले आणि आभार मानले.

error: Content is protected !!