सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खटाव तालुक्यातील चितळी येथे रस्त्यात कार चालकाला अडवून त्याचे अपहरण करत लूट केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. सदर व्यक्तीकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब चोरत त्याद्वारे तब्बल ८० हजार डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार ६४ लाख रुपये लुटण्यात आले होते. या प्रकरणी आता ९ जणांच्या टोळीचा पर्दाफाश सातारा पोलिसांनी केला आहे. दरोडा आणि सायबर क्राइमच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे.
उंब्रज येथील ऋषीकेश शेटे आणि त्यांचा भाऊ हे दोघे क्रिप्टो करन्सीचे ट्रेडिंग करत असून हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ऋषीकेश शेटे हे कारमधून आटपाडी येथून उंब्रजकडे येत असताना चितळी गावच्या हद्दीत संशयित आरोपींनी त्यांची कार रोखली आणि त्यांना मारहाण करत मोबाईल, टॅब, घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. तसंच मोबाईल, टॅबचे पासवर्ड मागून घेत तक्रारदार यांचे पाय बांधून त्यांना पुसेसावळी गावच्या हद्दीत एका शेतात सोडून दिले.तक्रारदार शेटे यांनी स्वत:ची सुटका करुन घेतल्यानंतर त्यांनी घरी येऊन ते व्यवसाय करत असलेल्या क्रिप्टो करन्सीचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून पाहिले असता त्यांच्या त्या खात्यावरील ८० हजार डॉलर हे आरोपींनी दुसर्या व्हॅलेटवर ट्रान्सफर केल्याचं समोर आले.
दरम्यान, या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात जात घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून एलसीबी पथकानेही तपासाला सुरुवात केली. गेली चारतपास सुरु असताना या प्रकरणातील ९ संशयित आरोपींना अटक करण्यात एलसीबीला यश आलं आहे. संशयित सर्वांना पुणे, कराड, इचलकरंजी, निपाणी येथून ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस त्यांच्याकडे अधिक चौकशी करत आहेत.
You must be logged in to post a comment.