सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीचे अधिकारी लोकांचे वीज कनेक्शन तोडत आहे. याचा निषेध म्हणून रिपाईच्या वतीने कनेक्शन तोडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा रिपाइं मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
गालफाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाॅकडाऊनमुळे अनेक कंपन्या व उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांचा रोजगार गेला आहे.त्यामुळे नागरिक वीजेचे बील भरू शकले नाही. याबाबत राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारकडून कनेक्शन न तोडण्याची ग्वाही दिली होती. मात्र, अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा वीज कनेक्शन तोडल जात आहे. लोक अडचणीत आहेत. अशा वेळी कनेक्शन तोडून त्यांच्या अडचणीत भर टाकली जात आहे. शासनाने प्रत्येक ग्राहकांना वीज भरण्यासाठी काही दिवसांची मुदत द्यावी. हे बील टप्प्याटप्याने भरण्याची सवलत दिली जावी. अन्यथा कनेक्शन तोडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल. तसेच सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखण्यात येतील, असा इशाराही निवेदनात गालफाडे यांनी दिला आहे.
निवेदन देताना रिपाइंच्या मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर गालफाडे यांच्यासह जिल्हा सहसचिव सागर फाळके, शहराध्यक्ष मधुकर घाडगे, शहर उपाध्यक्ष प्रणव मूळे, प्रसिद्धी प्रमुख जगनाथ खवले. शेखर वायदंडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.