सहाय्यक पोलीस निरीक्षक बधे यांची चौकशी करण्याची रिपाइंची मागणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एम. आय. डी. सी पोलिस ठाणे व संगमनगर पोलीस चौकीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु आहेत. अशा बेकायदेशीर धंद्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक बधे यांचा वरदहस्त आहे. अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या आपल्या एपीआय बधे यांची चौकशी करावी, अशी मागणी रिपाइंचे सातारा शहराध्यक्ष जयवंत कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एम. आय. डी. सी व संगमनगर पोलीस चौकीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु आहेत. एकंदरच दारू,मटका,चोरी तसेच इतर अनेक काळे धंदे एपीआय बधे यांच्या वरदहस्तामुळे सुरू आहेत. एमआयडीसीतील व प्रतापसिंहनगरमधील मटका व्यावसायिक यांचे ऊठबस असते तसेच प्रतापसिंह नगर येथील कृष्णा कॅनल येथील देशी दारूच्या दुकानातून प्रतापसिंहनगर तसेच कोडोली भागामध्ये अवैध दारू दररोज विक्रीला जाते. हे बधे यांना माहित असताना ते कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत.

अशा अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या आपल्या पोलिस दलातील एपीआय बधे यांचे या अवैध व्यवसायाला पाठबळ असल्याचे स्थानिक नागरिकांकडून समोर आले आहे. यापूर्वी देखील बधे यांची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही सातारा शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना भेटून केली होती. मात्र आजअखेर त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. आपण जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून कार्य करत असतांना अशाप्रकारे काही अधिकारी अवैध धंद्यांना आणि त्यामागे असणाऱ्या प्रवृत्तीला पोसण्याचं काम करत आहेत. एसपी साहेब याप्रकरणी तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालून बधे यांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अन्यथा पोलीस मुख्यालयासमोरच आरपीआयच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिलेल्या निवेदनात शेवटी जयवंत कांबळे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!