एस. एम. देशमुख यांना विधानपरिषदेवर घ्या

पत्रकारांच्या शिष्टमंडळाचे शरद पवार यांना साकडे; निवेदनास सकारात्मक प्रतिसाद

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मराठी पत्रकार परिषद आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते एस. एम. देशमुख यांना विधान परिषदेवर घेण्याच्या मागणीसाठी निवेदन सादर केले. त्यास दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला.

विधान परिषदेच्या बारा जागांवर राज्यपालांकडून लवकरच नियुक्त्या करण्यात येणार आहेत. साहित्य, पत्रकारिता, कला, सामाजिक कार्य आदी क्षेत्रातील व्यक्तींचीच या जागांवर नियुक्ती केली जावी, अशी राज्यातून मागणी होत आहे. त्यानुषंगाने पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून एस. एम. देशमुख यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी राज्यातील पत्रकारांकडून करण्यात येत आहे. 

‘पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक म्हणून ओळख’
एस. एम. देशमुख यांनी बारा वर्षे लढा देऊन राज्यात पत्रकार संरक्षण कायदा मिळविला. महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव असे राज्य आहे, की जिथे पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा ठरविला गेला असून हल्ला करणार्‍यांना तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्याचे जनक म्हणून देशमुख यांना ओळखले जाते. पत्रकार पेन्शन असेल किंवा पत्रकार आरोग्य योजना किंवा छोट्या-मोठ्या वर्तमानपत्रांचे प्रश्‍न असतील देशमुख यांनी या प्रश्नांबाबत वेळोवेळी आवाज उठविला आणि पत्रकारांना न्याय मिळवून दिला. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मोठा लढा देऊन त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी देखील पार पाडली. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी महाराष्ट्रात मोठे काम केले आहे. साहित्य क्षेत्रातही देशमुख यांनी भरीव कार्य केले असून त्यांची आठ पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत. त्यामुळे देशमुख यांना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घेतले गेले तर राज्यातील पत्रकारांचे प्रश्‍न सुटतील शिवाय समाजाच्या प्रश्‍नांवरही ते आवाज उठवतील, असा विश्‍वास या शिष्टमंडळाने शरद पवार यांना दिला. त्यावर शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 
शरद पवार यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे ,विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुजित आंबेकर, विठ्ठल ऊर्फ समाधान हेंद्रे आदींचा समावेश होता.
error: Content is protected !!