साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न कधी ?


आज जन्मशताब्दीची सांगता तरीही हा थोर साहित्यिक उपेक्षित; मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी

सातारा (भूमिशिल्प स्पेशल) : ‘जग बदल घालूनी घाव । सांगूनी गेले मज भीमराव, ‘तू गुलाम नाहीस तर या वास्तव जगाचा निर्माता आहेस…’ हे व असे अनेक लोकप्रिय विचार जगाला देणारे थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (1 ऑगस्ट) जयंती मात्र आज त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असूनही ते भारतरत्न या पुरस्कारापासून वंचित आहेत ही या महान साहित्यिकाची आणि त्याच्या साहित्याची उपेक्षाच नाही का ?


’माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काह्यली’ यासारखी दर्जेदार लावणी, ’फकिरा’, ’आवडी’, ’माकडीचा माळ’, ’चिखलातील कमळ’, ’वारणेचा वाघ’, ’वैजयंता’ अशा प्रसिद्ध कादंबर्‍या, ’पिसाळलेला माणूस’, ’निखारा’, ’जिवंत काडतुस’, ’गजाआड’ यांसारखे कथासंग्रह शिवाय ’अकलेची गोष्ट’, ’कापर्‍या चोर’, ’देशभक्त घोटाळे’, ’पुढारी मिळाला’ ही लोकनाट्ये असो किंवा ’सुलतान’, ’पेंग्याचं लगीन’ ही नाटकं असो हा शब्दप्रभू समीक्षेच्या बाबतीतही उपेक्षितच राहिला. त्यांच्या ’फकिरा’ या जगप्रसिद्ध कादंबरीवर ज्येष्ठ समीक्षक आणि 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेली समीक्षा वगळता त्यांच्या अन्य साहित्यावर समीक्षण केल्याचे पाहायला मिळत नाही.

रशियात पोवाड्यातून शिवचरित्र मांडणारा शिवशाहीर
अण्णा भाऊंनी वयाच्या 14 व्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला खरा पण जातिव्यवस्थेला कंटाळून अवघ्या दीड दिवसातच शाळेला रामराम ठोकला. पुढे अण्णा भाऊंनी अशी साहित्य कलाकृती निर्माण केली, की त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून शेकडो जणांनी पीएच. डी. केली. अण्णा भाऊंच्या अनेक कथा-कादंबर्‍या आज कित्येक विद्यापीठांत अभ्यासक्रमाला आहेत. दीड दिवसीय शालेय शिक्षण घेतलेल्या याच अण्णा भाऊंनी रशियात जाऊन पोवाड्यातून शिवचरित्र मांडले होते. ही त्यांची कला पाहून तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. 

अण्णा भाऊंच्या साहित्याचे वावडे आहे काय ?
अण्णा भाऊंच्या विपुल साहित्यापैकी आजवर केवळ कादंबरीवर दोनच खंड प्रकाशित झाले आहेत. त्यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठीची समितीच सध्या अस्तित्वात नाही. साहित्य प्रकाशित करण्याबाबत मागणी करूनही शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात अण्णा भाऊंचे साहित्य सरकारतर्फे प्रकाशित करण्यासाठी 2014 मध्ये ’साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन झाली. या समितीच्या माध्यमातून अण्णा भाऊंच्या कादंबरीवर दोन खंड देखील प्रकाशित झाले. अण्णा भाऊ साठे गौरव ग्रंथासह इतर साहित्य प्रकारांवर स्वतंत्र खंड प्रकाशित करण्याचा संकल्पही या समितीने सोडला होता मात्र युती सरकारने या समितीला मुदतवाढ न देता नवीन समिती स्थापन केली. या समितीने खंड तीन आणि चार प्रकाशित करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. सद्यस्थितीत कादंबरीवरील दोन्ही खंड संपले असून ते पुनर्मुद्रित केले गेले नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर ही समिती बरखास्त करण्यात आली. अजूनही नवीन समिती स्थापन केली गेली नसल्याने खंड निर्मितीचे काम थांबले आहे. आज अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असूनही त्यांच्या साहित्यावरील खंड प्रकाशित होत नाहीत ही एकप्रकारे शोकांतिकाच म्हणावी लागेल.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णा भाऊंचं योगदान मोठं 
स्वातंत्र्य चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम तसेच हैदराबाद मुक्ती संग्राम या विविध लढ्यातील अण्णा भाऊंचं योगदान मोलाचं आहे. दिनदुबळ्या, गोरगरीब तसेच शिक्षण आणि विकासापासून वंचित राहिलेल्या समाजासाठी अण्णा भाऊंनी आयुष्य वेचले.  समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही चारही मूल्ये आपल्या साहित्यातून रुजविणारे अण्णा भाऊ आजही भारतरत्न पुरस्कारापासून वंचित आहेत. समाज आणि राजकीय नेतेमंडळींकडून भलेही आता अण्णा भाऊंना भारतरत्न द्यावा, अशी आग्रही मागणी होत असली तरी ती प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार हे येणारा काळच ठरवेल.

अण्णा भाऊंची विपुल साहित्यसंपदा
1 ऑगस्ट 1920 ते 18 जुलै 1969 या अवघ्या 49 वर्षांच्या आयुष्यात अण्णा भाऊंनी हाताळलेले विविध साहित्य प्रकार पाहाता हा साहित्यप्रभू किती प्रतिभावंत लेखक होता हे कळून येते. 13 लोकनाट्ये, तीन नाटकं, 13 कथासंग्रह, 35 कादंबर्‍या, 1 शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवासवर्णन, 7 चित्रपट कथा शिवाय 250 गाणी, 300 कथा, लावण्या यांची तर मोजदादच नाही.





error: Content is protected !!