सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एका संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाचे दर्शन घडले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री या वाघाचे छायाचित्र टिपण्यात असून सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना ”कॉन्झर्वेशन रिझर्व्ह”चा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या भागामध्ये वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. 

गतवर्षी राज्य सरकारने सह्याद्रीमधील आठ वनक्षेत्रांना ”काॅन्झर्वेशन रिझर्व्ह”चे संरक्षण दिले होते. यामध्ये साताऱ्यातील जोर-जांभळी येथील ६ हजार ५११ हेक्टर, कोल्हापूरमधील विशालगड येथीला ९ हजार ३२४ हेक्टर, पन्हाळा ७ हजार २९१ हेक्टर, गगनबावडा १० हजार ५४८ हेक्टर, आजरा-भुदरगड २४ हजार ६६३ हेक्टरा, चंदगड २२ हजार ५२३ हेक्टर आणि सिंधुदुर्गमधील आंबोली-दोडामार्ग ५ हजार ६९२ हेक्टर आणि तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्हचा समावेश आहे. या वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव आणि खास करुन वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे.

वन विभागाने संरक्षित केलेल्या या आठ ”काॅन्झर्वेशन रिझर्व्ह”पैकी एका वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे. वाघ एका कॕमेर्यात कैद झाला आहे. त्याठिकाणी त्याने एक शिकार केल्याचेही दिसून येत आहे. शिकारीभोवती वाघ घुटमळत असल्याचेही दिसत आहे. हे छायाचित्र दुर्मिळ असून सह्याद्रीत आठ ”काॅन्झर्वेशन रिझर्व्ह”च्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन त्याठिकाणी वाघांचा संचार सुरू असल्याचे उघड झाले आहे.

error: Content is protected !!