(प्रातिनिधिक छायाचित्र)
सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, तसेच आरक्षणाची सरकारने तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी जावली तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार (दि.१८) जावली तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मोर्चासाठी मेढा येथे दाखल व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या संयोजकांकडून करण्यात आले आहे.
गेल्या ७५ वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित राहिला आहे. शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही. तसेच शासनाने अनेक वेळा आश्वासने देऊन धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे सकल धनगर समाजाकडून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आरक्षणाची अंमलबजावणी करून एसटीचे प्रमाणपत्र वितरित करावे, शेळी मेंढी विकास महामंडळास दहा हजार कोटींचा निधी देण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
धनगर समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी व आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नासाठी मेढा येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांनी तसेच महिला, युवक, युवतींनी या मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
-: शिवाजीराव गोरे, धनगर आरक्षण समिती, जावली.
You must be logged in to post a comment.