सलून, ब्युटी पार्लरची दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; अटींचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व सलून दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 

नाभिक दुकाने व ब्युटी पार्लरमध्ये सेवा देणार्‍या ग्राहकाला मास्क लावता येत नसल्याने कोरोना संसर्गाची शक्यता टाळण्यासाठी या आदेशात काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या असून त्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना 
* या आदेशान्वये फक्त केशकर्तन करणे, केसांना डाय करणे, व्हॅकसिंग, थ्रेडिंग यासाठीच परवानगी राहील. त्वचेशी निगडीत सर्व प्रकारच्या सेवांना परवानगी नसेल.
* सलून व ब्युटी पार्लरमध्ये येणार्‍या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवून या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणार्‍या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देवून त्याचवेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. सलून व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहक काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. 
* सलून दुकान आणि ब्युटी पार्लर दुकानात कारागीर व ज्या व्यक्तीचे केशकर्तन करावयाचे आहे अशी एकच व्यक्ती दुकानात असेल. उर्वरित लोक दुकानाबाहेर थांबतील. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर ठेवून अतिरिक्त कारागीराला काम करता येईल. 
* सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणार्‍या व्यक्ती व कारागिरांनी चेहर्‍यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड कायमस्वरुपी घालणे बंधनकारक आहे तसेच हातात ग्लोव्हज घालणे व अ‍ॅप्रन घालणे बंधनकारक राहील.
* एका ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे (उदा. खुर्ची व इतर अनुषंगिक साहित्य) निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. एका ग्राहकाला वापरेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसर्‍या ग्राहकाला वापरू नये. यासाठी एकदा वापरुन झाल्यावर विल्हेवाट लावता येईल असे टॉवेल किंवा नॅपकिनची उपलब्धता करुन त्याचा वापर करावा. त्यासाठी ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करुन ठेवावी. 
आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई 
दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास संबंधित दुकानधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल. कारागीराने चेहर्‍यावर मास्क परिधान न केल्यास संबधित व्यक्तीवर रु. 500/- दंड आकारण्यात येईल. एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास 500 रुपये तर दुसर्‍यांदा उल्लंघन झाल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल आणि तिसर्‍यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास 1000 रुपये तर दुसर्‍यांदा उल्लंघन झाल्यास 2000 दंड आकारण्याता येईल आणि तिसर्‍यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
error: Content is protected !!