हिंदवी पब्लिक स्कूलची दुहेरी सुवर्णकमाई

पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत समीर कांबळेची ऐतिहासिक कामगिरी; संस्थेकडून गौरव

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘खेळोत्सव पॅरा एडिशन–२०२५’ मध्ये साताऱ्यातील हिंदवी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी समीर कांबळे याने अभूतपूर्व यश मिळवले. इयत्ता सातवीतील या जिद्दी खेळाडूने पॅरालिंपिक ज्युनिअर गटातील १०० मीटर धावणे आणि गोळाफेक या दोन्ही स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

या यशानंतर शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, समन्वयक शुभम गायकवाड आणि गुरुकुल प्रमुख संदीप जाधव यांच्या हस्ते समीरचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष अमित कुलकर्णी म्हणाले, समीरने आपल्या जिद्दीच्या जोरावर सुवर्ण कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.ही सुरुवात असून भविष्यात तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही निश्चितच चमकेल.

मुख्याध्यापिका ज्योती काटकर म्हणाल्या, शारीरिक अडथळे हे कधीच स्वप्नांच्या आड येत नाहीत. परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाने अशक्यही शक्य होते, हे समीरने सिद्ध केले आहे. त्याच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

समीरच्या या दुहेरी विजयामुळे त्याचे कुटुंब, शिक्षक आणि विद्यार्थी अभिमानाने ऊर भरून कौतुक करत आहेत. पालकांनीही भावनिक होत, समीरने लहानपणापासूनच संघर्ष करून खेळात जिद्द दाखवली. त्याच्या मेहनतीला आज सुवर्ण फळ मिळाले,अशी भावना व्यक्त केली.

आता समीरची नजर राष्ट्रीय पॅरा क्रीडा स्पर्धांकडे आहे. शाळेच्या पाठिंब्याने तो आणखी मोठे यश मिळवेल, अशी आशा साताऱ्याच्या क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!