राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर फलटणमध्ये समाधानाचे वातावरण असून ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे. या निवडीबद्दल संजीवराजे यांच्यावर जिल्ह्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजीवराजे यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव अधिक बळकट होईल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विधान परिषद माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, मालोजीराजे सहकारी बँक व गोविंद मिल्क ॲन्ड मिल्क प्रोडक्टसच्या चेअरमन पदाची धुरा सध्या सांभाळत आहेत. सातारा जिल्हा परिषदेवर विविध मतदार संघातून सलग तीस वर्ष निवडून आलेल्या संजीवराजे यांनी यापुर्वी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अध्यक्षपदासह श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघात त्यांचा सतत संपर्क असुन या मतदार संघातील सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण व ते सोडविण्याची क्षमता आसलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने संपुर्ण जिल्ह्यातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!