शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवतीही सरसावल्या
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जनतेच्या इच्छाशक्तीच्या जोरावर जनतेच्या मनातला आणि जवळचा उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना जनता जनार्दनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमचा विजय दूर नाही, असे प्रतिपादन सौ. वैशाली शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवतींनी मोठी आघाडी घेतली आहे. प्रचार मोहिमेदरम्यान पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
सौ. वैशाली शिंदे म्हणाल्या की, जो विश्वास आदरणीय शरद पवारसाहेब आणि महाविकास आघाडीने दाखवला, तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य जनतेतून आलेले नेतृत्व आहे. आजवर त्यांनी ज्या ज्या भागाचे नेतृत्व केले तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला.त्यांच्या कर्तुत्वावर जनतेचा चांगलाच विश्वास आहे. त्यामुळे मतदार आम्हासच विजयाचा कौल देतील, याची आम्हास खात्री आहे. आम्ही विजयाच्या अगदी जवळ आहोत. मतदारांकडूनही तशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र अंतिम विजयापर्यंत प्रयत्न करणे हे कार्यकर्त्यांचे आणि आमचेही कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.
शशिकांत शिंदे यांच्यावर होत असलेल्या आरोपां बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप होतातच, मात्र सध्या विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन खोटेनाटे आरोप होत आहेत. विरोधी नेतृत्वाचा राजकीय स्तर घसरल्याचेच हे लक्षण आहे. वस्तुस्थिती माहीत असल्याने जागृत मतदार आणि जनता हे आरोप गांभीर्याने घेत नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आम्हाला विजय मिळेल, याची आम्हास शंभर टक्के खात्री आहे.
You must be logged in to post a comment.