खा. उदयनराजेंनी घेतला शहरातील आरक्षित पार्किग जागांचा आढावा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील आरक्षित पार्किग जागांचा आढावा आज खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या शासकिय विश्रामगृहावर घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अँड.डि.जी.बनकर, बिल्डर्स असोसिएशनचे सागर साळुखे, माजिद कच्छी, आर्किटेक्ट असोसिएशनचे अनिरुष्द दोशी, सुधीर शिंदे, मयुर गांधी, नगररचनाकार अनील पाटील, नगररचना सहा. आशिष मोगरकर, सतीश साखरे प्रकाश राजेशिर्के प्रमुख उपस्थित होते.

सातारा शहराची हद्दवाढ झाल्याने विस्तार झाला आहे. सातारा शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पुरेसे पार्किंग असेल तर एकंदरीत व्यापार-उदिमामध्ये वाढ होण्याबरोबरच सातारा शहराच्या सुविधेत आणि सौदर्यात भर पडणार आहे. सातारा जिल्हा बिल्डर्स असोसिएशन आणि सातारा जिल्हा आर्किटेक्ट असोसिएशन यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि नगरपरिषदेचे शहरविकास विभाग यांच्या संयुक्त समितीच्या माध्यमातुन शहरातील आरक्षित जागा विकसित करण्याबाबत नवीन प्रस्ताव दया पुर्वीच्या प्रस्तावातील, प्रत्यक्षात उपयोगात येणा-या पार्किंगच्या जागा दोन दिवसांत नागरीकांच्या उपयोगाकरीता उपलब्ध करून दया, अशा सूचना खा. उदयनराजे यांनी दिल्या.

मागील आढावा बैठकीत प्रशासनाने तहसिल कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या ०२ गुंठे जागेत, तेली खड्डा येथील ०२ गुंठे जागेत, मार्केट कमिटी एन.आर.शेठ दुकानाचे समोरील ३.५ गुंठे, रेव्हरंड टिळक मेमो चर्चच्या ९ गुंठे, राजवाडा डि.सी.सी.बॅन्क जवळील जागेमधील आरक्षित पार्किगच्या प्रस्तावांचे काय झाले अशी विचारणा केली. कोरोनामुळे दिड-दोन वर्षे विस्कळीतपणा आला असेल परंतु पार्किंगची सुविधा नागरीकांना दिली गेली पाहीजे. यामध्ये आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही अशी ताकिद उदयनराजे दिली.

येत्या दोन दिवसांत वरील ठिकाणी पार्किंगचा वापर नागरिकांकडून होत असल्याचे आम्हाला दिसले पाहीजे. हद्दवाढ झाल्याने नवीन भागाचा डि पी. तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये याविषयांतील तज्ञांची मदत घेतली पाहीजे. त्यासाठी सेवाभावी वृत्तीने नगरपरिषदेस सेवा देवू शकणारे बिल्डर असोसिएशन आणि आर्किटेक्ट असोसिएशन या संघटनांच्या प्रत्येकी दोन तज्ञ सदस्यांना घेवून प्रशासनाने त्यांच्या बरोबर संयुक्त बैठका घेवून नवीन डेव्हलपमेंट प्लॅन तयार करावा जेणेकरुन प्रशासनावर ताण न येता, सातारच्या भविष्यातील सुविधांबाबत सुयोग्य नियोजन करता येईल, असे सांगितले.

error: Content is protected !!