साताऱ्यातील शिवसैनिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा : मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील शिवसैनिक चांगले काम करत आहेत. मी त्यांचे काम जवळून पाहतो आहे. त्यांनी कोरोना काळात अनेक गरजू रुग्णांना मदत केली आहे. शहरातील वेगवेगळय़ा भागात शिवसेनेच्या नागरिकांना सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत. शिवसैनिकांचे सातारा शहरात काम पाहून त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. सातारा शहराच्या विकासाच्या अनुषंगाने त्यांना लागेल ती मदत मी करणार आहे, अशी ग्वाही राज्याचे बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी मुंबई येथे जावून सातारा शहर शिवसेनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे, उपशहरप्रमुख अभिजित सपकाळ, गणेश अहिवळे, विभागप्रमुख अमोल खुडे, रुपेश सपकाळ आदी उपस्थित होते. सातारी पद्धतीने सातारी कंदी पेढयाचा हार, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, साताऱ्यातील शिवसेनेचे आमचे शहरप्रमुख निलेश मोरे हे वैद्यकीय कक्ष असेल सातारा शहर शिवसेना असेल यांच्या माध्यमातून चांगले काम करत आहेत. शहरातील गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी ते वेळीच धावून जात आहेत. शहरातील विकासाच्या दृष्टीने त्यांनी अनेकदा माझ्याशी चर्चा केली आहे. शहरातील विकासाच्या अनुषंगाने सातारा शहरातील शिवसैनिकांच्या पाठीशी मी सैदैव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

साताऱ्याहून शिवसैनिक मंत्री एकनाथ शिंदे यांना खास शुभेच्छा देण्यासाठी मुंबई येथे गेले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी सातारी पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या घरच्या मायेच्या आपुलकीच्या माणसांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याने काही वेळ मंत्रीही त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना भारावून गेले होते.

error: Content is protected !!