सातारा सिव्हिलमध्ये कोविड चाचणी केंद्र सुरू करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार; वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या कामास गती देण्याची ग्वाही

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन पूर्ण खबरदारी घेत असून कोरोना संदर्भात काम करणार्‍या यंत्रणेला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. रूग्णांचा नमुना अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विकास कामांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
कोरोनाबाधित रुग्णाला तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून पवार म्हणाले, ’लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असून नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयीची भीतीही कमी झाली आहे. परंतु प्रत्येकाने मास्क वापरुन व सुरक्षित अंतर ठेवूनच आपली काळजी घ्यावी आणि शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.’ आज लॉकडाऊनला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनामार्फत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत असून यापुढेही धान्य देण्याची शासनाची तयारी आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी आराखडा तयार करू
प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शासकीय इमारती असून आमदार फंडातून त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील 10 टक्के निधी इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला असता मागील वर्षी 28 टक्के धरणातील पाणीसाठा होता पण यंदा समाधानकारक म्हणजे 36 टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचे स्थानिक पातळीवरील निर्णय पालकमंत्री व जिल्हाधिकारी घेतील असे सांगतानाच विकासाबरोबरच रोजगारनिर्मितीसाठी भविष्याच्या महाराष्ट्रात मोठे उद्योग कसे येतील याचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दूरदर्शी आराखडा तयार करण्यात येईल, असेही पवार म्हणाले.

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूरी देण्यात आली होती परंतु आजपर्यंत या महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांनी मंत्रालयाकडे पाठवलेले तीन प्रस्ताव दाखवले आहेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागेसंदर्भात बैठक घेण्यात येणार असून पुढील 50 वर्षे डोळ्यांसमोर ठेवून शासकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामास गती देण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.
error: Content is protected !!