सातारा जिल्हा बँकेचा नाबार्डकडून सन्मान

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्यावतीने सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) जाहिर केला आहे .

या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या शुभहस्ते दिनांक १२ जुलै २०२१ रोजी बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांना केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हयाच्या कृषि व ग्रामीण विकासासाठी अविरत कार्यरत आहे . बँकेने शेतकरी सभासदांना रुपये ३ लाखापर्यंतचे पिक कर्ज ‘शून्य’ टक्के व्याजदराने, रु .३० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज ‘शून्य’ टक्के व्याजदराने उपलब्ध करुन दिले आहे . विकास संस्था सक्षमीकरणासाठी बँक पातळीवर १००% कर्ज वसुली करणा-या संस्थांना गत ११ वर्षापासून दरवर्षी रुपये २६०००/- ते रुपये २९०००/ प्रमाणे आजपर्यंत प्रती विकास सेवा सोसायटीस रु २.८३ लाख वसुली प्रोत्साहन निधी दिलेला आहे . संस्था पातळीवर १००% कर्ज वसुली करणा-या संस्थांना रु. १५०००/ पर्यंत गौरव निधी उपलब्ध करुन दिला आहे . त्यामुळे संस्था सक्षम होण्यास मोलाची मदत झालेली आहे .

जिल्हयातील शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, संचालक मंडळ व सचिव बांधव आणि जिल्हयातील साखर कारखान्यांच्या सहकार्यामुळे यावर्षी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवरही बँकेची ९७% एवढी देशात सर्वोच्च कर्ज वसुली झालेली आहे .त्याच बरोबर ९५४ संस्थांपैकी ८५७ संस्थांची बँक पातळीवर १००% कर्ज वसुली झालेली आहे . दि .३१/०३/२०२१ अखेर ९५४ विकास सेवा संस्थांपैकी ८५० संस्था नफ्यात असून बँकेने ७ दशकाच्या वाटसालीमध्ये वसुली व नफ्यामध्ये सातत्य ठेवून विक्रम प्रस्थापित केलेला आहे .

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ग्रामीण भागातील तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखा, ९५४ विकास सेवा संस्था, ५३ एटीएम व मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा देत आहे . सातारा जिल्हा मध्य .सह .बँक भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) च्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीवर लिंक झालेमुळे ग्राहकांना भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे खरेदी व्यवहार करणे, फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत . बँक फक्त पीक कर्ज वाटप न करता मध्यम व दीर्घ मुदत कर्ज योजनांचे माध्यमातून कर्ज वाटपात अग्रेसर राहिली आहे . बँक विकास संस्था सक्षमीकरणासाठी प्रत्येक वर्षी नफ्यातून तरतूद करते त्यामुळे विकास संस्थांना नफ्यात येणेस मदत होत आहे .

शेतक-यांना व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारात वैद्यकिय उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो . शेतक-यांची आर्थिक अडचण विचारांत घेवून बँकेने शेतकरी ग्रुप मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसि राबविणेचा निर्णय घेतला आहे . या योजनेसाठी बँक आपले उत्पन्नातून रु .१२ कोटी पर्यंत विमा हप्ता भरणार आहे . बँकांच्या ठेवीदारांसाठी अद्याप कुठल्याही बँकेने स्वखर्चातून विमा योजना कार्यान्वित केलेली नाही . सातारा जिल्हा बँकेच्या १० लाख बचत ठेव खातेदारांसाठी रु .१.०० कोटी खर्च करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे सुरक्षा कवच उपलब्ध करुन देणार आहे .
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु .१ कोटी १६ लाख, जिल्हयातील मजूरांसाठी रु .१.०० कोटीचे जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण केले आहे . जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी रु ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत .

सातारा जिल्हा बँकेच्या सर्वंकष आर्थिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकी जपत दिलेले योगदान यामुळेच बँकेस नाबार्डने उत्कृष्ठ कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट परफॉर्मन्स बँक म्हणून Special Commemorative Award (विशेष स्मृतिचिन्ह पुरस्कार) देवून गौरविले आहे . आॅन लाईन पुरस्कार वितरण समारंभास बँकेचे अध्यक्ष मा .आ .श्रीमंत छ .शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष श्री .सुनिल माने, बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती मा .ना .श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना .बाळासाहेब पाटील व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते . बँकेस मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मा .संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे .

error: Content is protected !!