पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची सातारा जिल्ह्याला उत्सुकता

कराडमध्ये आज धडाडणार तोफ; यशवंत विचारांबाबत काय बोलणार याकडे लक्ष

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील बहुतेक सर्व लोकसभेच्या जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय जनता पक्षाने ज्या जागा दिल्या आहेत. त्या निवडून आणण्याचा निर्धार आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना पूर्ण मदत व ताकद देण्याचे कार्य नरेंद्र मोदी सध्या करत असताना दिसत आहेत. त्याचाच एक अंक म्हणजे पंतप्रधान मोदी यांची कराड येथे सोमवारी होणारी विराट सभा होय. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा आणि हातकणंगले या मतदारसंघातील विरोधकां संदर्भात तसेच यशवंत विचारा बाबत काय बोलणार याची उत्सुकता या दोन्ही मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम महाराष्ट्रावर ही लक्ष केंद्रित केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले आणि साताऱ्यापासून जवळ असणाऱ्या सांगली मतदार संघात वादळ निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले आहे. कोल्हापूर येथील त्यांच्या सभेला तुफानी प्रतिसाद मिळाला.कोल्हापूरकरांची मने त्यांनी स्थानिक संदर्भ देत जिंकली.आता सातारा,हातकणंगले या मतदारसंघासाठी त्यांनी व युतीमधील मित्रपक्षांनी कराड येथे महासंकल्प विजय जाहीर सभा घेतली आहे. किमान एक लाख एक कार्यकर्ते, भाजप प्रेमी या सभेला येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा आकडा अजून बराच वाढू शकतो असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.या ठिकाणी सावलीसाठी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच सभा दुपारी एक वाजता असल्याने वैद्यकीय व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडेही सातारकरांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूरच्या सभेत त्यांनी विरोधात असणाऱ्या उमेदवारांबद्दल अवाक्षरही काढले नाही. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या शाहू महाराज छत्रपती यांच्या बद्दलही कोणतीच टीका टिपणी केली नाही. खरे तर संभाजी राजे छत्रपती हे त्यांचे चिरंजीव.त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रपती निर्वाचित राज्यसभेचे खासदार केले होते. असे असतानाही पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही वैयक्तिक टीका टिपणी केली नाही. उलट भाजपची धोरणे आणि विकासाचे कार्य कोल्हापूरच्या जनतेला अपील होईल अशा शब्दात स्पष्ट केले, आणि कोल्हापूरकरांची मने जिंकली.

कराड येथेही ते अशीच व्यूहरचना करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी २०१९ च्या पोट निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी सातारा येथे आले होते , तर आता पुन्हा त्यांच्या प्रचारासाठी ते कराड येथे येत आहेत. त्यांच्या भाषणात काँग्रेसचा उल्लेख न करता काँग्रेसवर तीव्र शब्दात हल्ला असतो. शरद पवार यांच्यावर अनुल्लेखाने टीका टिपणी असते. तसेच येथील स्थानिक संदर्भही त्यांच्या भाषणात असतात. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यांना नेऊन संघाचे धडे देणाऱ्या खटाव येथील स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण त्यांनी २०१९ च्या सभेतही काढली होती. त्यांना अभिवादन केले होते. थोडक्यात स्थानिक संदर्भ आणि महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख ते त्यांच्या भाषणात नेहमीच करतात.

डॉक्टर अतुल भोसले यांनी सभा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सभेच्या ठिकाणास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

सातारकरांचे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी पुढील टर्ममध्ये उपाययोजना काय असाव्यात याची मांडणी तसेच मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या भाषणात करतील असे मतदारांना अपेक्षित आहे. कराड येथील ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, दोन लोकसभा मतदारसंघांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे अशी भाजपची रणनीती आहे.

error: Content is protected !!