सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा):राजापूर (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा सातारा जिल्ह्यातील पत्रकार आक्रमक झाले. त्यांनी तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. पत्रकारांनी दिलेल्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्ह्यात यापुढे हल्ल्याला प्रतिहल्ल्याने उत्तर देवू. वारीशे यांची हत्या करणार्यावर कठोर शिक्षा करावी तसेच पत्रकारांवर हल्ला करणार्या प्रवृत्तींवर राज्य सरकारने वेळीच कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलने करु, असा इशारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी यावेळी दिला.
पत्रकार शशिकांत वारीसे यांचा कट रचून केलेला खून असल्याने या घटनेचा निषेध करत सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित तहसीलदार कार्यालयांवर शुक्रवारी मोर्चे काढले. सातार्यात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. ‘हमसे जो टकरायेगा..मिट्टी मे मिल जाएगा’, ‘पत्रकार एकजुटीचा विजय असो’, ‘नादाला लागलात तर… ठोकून काढू’, ‘पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या खुन्याला अटक झालीच पाहिजे’, ‘मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो’, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येत आहेत. मराठी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आंदालने करण्यात आली. या आंदोलनात प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडियातील पत्रकार सहभागी झाले आहेत. सातार्यातील पत्रकारांनी कायमच आक्रमक भूमिका ठेवली आहे. हल्ले केले तर आम्ही प्रतिहल्ले करतो. अपप्रवृत्तीविरोधात चाल करुन जातो. हीच पध्दत पत्रकार संघटनांनी अवलंबली पाहिजे. अन्यायाविरोधात पत्रकारांनी संघटित होवून ताकदीने उतरले पाहिजे. सातार्यातील गुन्हेगारीने टोकाचा कळस गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांसमोर संकट उभे रहात आहे. तरीही जिल्ह्यातील पत्रकारांनी आक्रमक पत्रकारिता सुरु ठेवली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांना धमक्या दिल्या जातात. हल्ले करण्याचे प्रकार घडतात. हा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. आपण ज्या परिस्थितीतून आलोय त्याचा विचार करता आपल्याला हाणामार्या, मारामार्या नवीन नाहीत. आपण बांगड्या भरलेल्या नाहीत. आपल्यालाही लाठ्याकाठ्या हातात घेता येतात.आम्ही संयमी, सहनशील असतो म्हणजे आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. राज्याचे गृहमंत्रालय हत्येच्या घटनेनंतर डोळे मिटून गप्प बसणार असेल तर आम्हीही शांत बसणार नाही. आम्हालाही शस्त्र हातात घेता येतात. यापूर्वी आम्ही लाठ्याकाठ्यांची आंदालने केली आहेत, हे राज्य सरकारने, प्रशासनाने लक्षात घ्यावे. संबंधित संशयित आरोपीची पाहण्यासारखी बडदास्त ठेवली जात असल्याने याचा आम्ही निषेध करतो. संशयिताची सिव्हील हॉस्पिटलमधून जेलमध्ये रवानगी करावी. अन्यथा सातार्यातील पत्रकार रत्नागिरीत जायला कमी पडणार नाहीत. या प्रकरणाचा छडा लावून दोषींचा कडक शिक्षा झाली पाहिजे. मास्टर माईंड शोधून त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पत्रकार शांत बसणार नाहीत. सातार्यातील अपवृत्तींना यानिमित्ताने आम्हाला सांगायचे आहे आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आमच्यातील कुठल्या तरी पत्रकाराला बाजूला गाठून आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा, फूट पाडण्याचा किंवा कुणावर हात उचलण्याचा, धमकी देण्याचा प्रयत्न झाला तर सोडणार नाही, पत्रकारिता सोडायला लागली तरी चालेल. हल्ल्याला प्रतिहल्ला ही सातार्याची स्टाईल असून ती महाराष्ट्राला कळली पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, सातारा जिल्ह्यात पत्रकार संघटनेची भक्कम बांधणी व उभारणी केल्यामुळे कुठल्याही अपप्रवृत्ती जिल्ह्यातील पत्रकारांविरोधात कृत्य करत नाहीत. देशातील कुठल्याही पत्रकाराच्या केसाला धक्का जरी लागला तरी सातार्यातील शेकडो पत्रकार त्याच्या मदतीसाठी धावून जातील. यापुढे पत्रकारांच्याबाबत घटना घडल्या तर अपप्रवृत्तीला सातारी इंगा दाखवण्यास मागे-पुढे पाहणार नाही. या घटनेची दखल केंद्र व राज्य सरकार तसेच पोलिस प्रशासनाने घेवून पुढील कारवाई करावी, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलने करावे लागतील, असा इशारा दिला.
ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे म्हणाले, पत्रकाराची हत्या होणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. सामान्यांचे, कष्टकर्यांचे हे सरकार आहे, असे आताचे सरकार म्हणत आहे. हे सरकार पत्रकारांसाठी, पत्रकारांचे आवाज न दाबवणारे आहे सरकार आहे, असा विश्वास पत्रकारांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.
दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांची भेट घेवून सर्व पत्रकार बांधवांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिपक शिंदे,ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे,डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष संतोष (सनी) शिंदे ,उपाध्यक्ष संग्राम निकाळजे,सचिव पद्माकर सोळवंडे, खजिनदार प्रशांत जगताप, विठ्ठल हेंद्रे, प्रविण शिंगटे, आदेश खताळ, महेंद्र खंदारे, विशाल गुजर, साई सावंत, अरुण जावळे, केशव चव्हाण, किरण अडागळे, अमित वाघमारे, अजय कदम, शिवाजी कदम, बाळू मोरे, राजेंद्र साबळे, प्रतीक भद्रे, गुरुनाथ जाधव, अमोल निकम,महेश क्षीरसागर, निखिल मोरे,प्रकाश शिंदे,संजय कारंडे,सचिन सापते,संजय सुपेकर,रिजवन सय्यद,जावेद खान,विजय लासुरे,धनराज जगताप,शुभम गुजर, मोहन जगताप, दीपक दीक्षित,केशव चव्हाण,गुरुदास अडागळे, अजय कणसे,दिपक देशमुख, गौरी आवळे, अक्षय गोरे,प्रमोद फरांदे, प्रमोद इंगळे व पत्रकार उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.