सातारा जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून सुरू

२३५ पदांसाठी तब्बल तेरा हजार हजार तीस अर्ज, पोलीस प्रशासन सज्ज

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २३५ पदासाठी बुधवार दि.१९ जून पासून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत सलग आठ दिवस ही भरती प्रक्रिया येथील पोलीस कवायत मैदानावर सुरू राहणार आहे. पोलीस दलातील विविध पदांसाठी तब्बल तेरा हजार हजार तीस उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस भरती विषयी माहिती देताना शेख पुढे म्हणाले,पोलिस दलात २३५ पदांमध्ये ३९ पदे ही चालक पदासाठी, तर पोलिस कॉन्स्टेबल व बँड वादकांसाठी एकूण १९६ पदे आहेत.उमेदवारांनी ज्या पदासाठी अर्ज केला आहे.त्याचे प्रवेश पत्र त्यांना तत्काळ दिले जाणार असून शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र तपासण्यासाठी चार टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे . शैक्षणिक प्रमाणपत्रांचे दोन छायांकित संच, सहा पासपोर्ट साईज फोटो व जात पडताळणी प्रमाणपत्र या भरतीसाठी अनिवार्य आहे.

मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात मुले येणार असल्यामुळे कवायत मैदानाचा काही भाग तसेच परिसरातील हॉल काही मंगल कार्यालय येथे त्यांच्या निवासाची सोय एका दिवसाच्या निवासासाठी करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये प्रवेश भरतीसाठी अर्ज केला असेल तर तसा स्पष्ट उल्लेख त्यांच्या प्रवेश पत्रावर राहणार आहे. एका वेळी तीन पदासाठी अर्ज केला असेल तर तारखेचा घोळ आणि पदभरतीची अडचण होऊ नये यासाठी स्वयंस्पष्ट तारखा प्रवेश पत्रावर नमूद केल्या जाणार आहेत.

उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रमाणपत्रे जात पडताळणीचे दाखले अधिवास प्रमाणपत्र आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे आणणे आवश्यक आहे .भरती प्रक्रिये संदर्भात कोणी नोकरीच लावतो असे सांगून संपर्क साधला तर त्याची खबर तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी असेही समीर शेख यांनी आवर्जून नमूद केले कागदपत्रांची छाननी त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी तसेच १६०० मीटर धावणे १०० मीटर धावणे व थाळी फेक अशा निकषांमधून पार पडलेल्या उमेदवारांची पोलीस दलाच्या वेबसाईटवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून पोलीस कवायत मैदानावर सुद्धा ही यादी प्रदर्शित केली जाणार आहे. यामधील एकूण उमेदवारांच्या दहा टक्के गुणवत्ता यादीतील उमेदवारांना दोन टप्प्यांमध्ये लेखी परीक्षेसाठी पाचारण केले जाणार आहे . मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के व लेखी परीक्षेत चाळीस टक्के गुण मिळवणारे उमेदवार पात्र ठरणार आहेत .उमेदवारांना शंका असल्यास त्यांनी O२१६२-२३११८१ या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

भरतीची सर्व प्रक्रिया येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे . पावसाची शक्यता लक्षात घेऊन पोलीस कवायत मैदानाचा भाग कोरडा कसा राहील यासाठी टारपोलिन कव्हरची व्यवस्था करण्यात आली आहे . तसेच धाव मार्गावर मैदान ओले होणार नाही यासाठी भुसा आणि इतर साहित्याचा वापर करून मैदान कोरडे करण्याची व्यवस्था होईल काही तांत्रिक कारणास्तव मैदानी परीक्षा होऊ शकल्या नाहीत तर त्याची दखल घेऊन पर्यायी परीक्षेची व्यवस्था केली जाईल.भरती प्रक्रियेसाठी तब्बल तेरा हजार हजार तीस उमेदवार येणार आहेत त्याकरिता कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस कवायत मैदानावर बंदोबस्त तैनात राहणार आहे.

राष्ट्रवादी भवन ते पोलीस कवायत मैदान परिसर हा रस्ता भरती प्रक्रियेनिमित्त प्रतिबंधित करण्यात येणार असून एसटी महामंडळाला पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सातारा पोलिसांनी भरतीसाठी येणाऱ्या मुलांची निवासाची सोय केल्याने त्यांची तारांबळ थांबणार आहे .

error: Content is protected !!