सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर, जावली, वाई, पाटण व कऱ्हाड तालुक्यात जोरदार सरी पडत आहेत. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. तर २४ तासांत कोयना धरणात दीड टीमएमसीने वाढ झाली. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ५१.४९ टीएमसी साठा झाला होता. तर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नवजाला ९८ मिलीमीटर झाला.
जिल्ह्यात तीन आठवड्यांच्या खंडानंतर मागील आठवड्यात पाऊस सुरू झाला आहे. सध्या हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिमेकडे भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही हळू हळू वाढ होताना दिसून येत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात नवजा येथे सर्वाधिक ९८ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत तेथे १८२४ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयनेला ४९ व जून महिन्यापासून १३१२ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ६७ आणि यावर्षी आतापर्यंत १८३० मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. शनिवारच्या तुलनेत पश्चिम भागात पाऊस अधिक झाला.रविवारी सकाळी कोयना धरणात ५०.०४ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर सोमवारी ५१.४९ टीएमसी साठा होता. कोयना धरणात २४ तासांत जवळपास दीड टीएमसी पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाºया पाण्याची आवक चांगली आहे. सकाळच्या सुमारास १६७०६ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरण परिसरातही पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातही हळू हळू वाढ होताना दिसून येत आहे. पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. अजुनही ओढ्यांना पाणी नाही. तर सातारा शहरात रविवारी रात्रीपासून चांगला पाऊस होत आहे. सोमवारी सकाळीही सरी पडल्या.
You must be logged in to post a comment.