तो बॅनर नैसर्गिकरित्याच फाटला ; सातारा पोलिसांचा दावा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील ग्रेडसेप्रेटरवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान,त्याबाबत चौकशी केली असता तो फलक कोणीही फाडला नसून तो नैसर्गिकरित्या फाटून खाली पडल्याचे निष्पन्न झाले असून नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन सातारा पोलीस अधीक्षकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहेे.

सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (दि ९ जानेवारी) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, आज (९ जानेवारी) सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग असे लिहिलेला नाम फलक अज्ञाताने फाडल्याचे निदर्शनास आले. शहरात याची माहिती समजताच पोवईनाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक जमा होऊ लागले. पोलिसांच्या ही बाब निर्दशनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला.

दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दीपत्रक काढून या घटनेबाबत स्पष्टीकरण केले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ग्रेडसेप्रेटरवरील फलक नैसर्गिकरित्या फाटून पडला आहे. कोणीही तो फलक फाडला नसून सर्वानी शांतता राखावी तसेच अनुचित प्रकार घडणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.असे आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

error: Content is protected !!