सातारा- जावलीचाही दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश

आ.शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): दुष्काळाच्या छायेत असलेल्या सातारा आणि जावली तालुक्याला न्याय मिळावा यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यांना दुष्काळी म्हणून घोषित करावे आणि शासनाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली.आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करण्याचा निर्णय दोन्ही मंत्रिमहोदयांनी घेतला असून लकवरच राज्य शासनाकडून तशी यादी प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दोन्ही तालुक्यांच्या वतीने ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दुष्काळी तालुके जाहीर केले होते मात्र, त्यामध्ये सातारा आणि जावली तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या दोन्ही तालुक्यांमध्येही भीषण परिस्थिती आहे. असे असताना सातारा- जावली तालुक्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. हा अन्याय असून प्रसंगी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला होता. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून दोन्ही तालुक्यांना दुष्काळी तालुके घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबई येथे शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला असून पाण्यावाचून पिके करपू लागली आहेत. अत्यल्प पावसामुळे सोयाबीन, ऊस, स्ट्रॉबेरी यासह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. असे असताना या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत न झाल्याने तालुक्यातील जनतेमध्ये नाराजी आणि असंतोषाची भावना आहे. दोन्ही तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सातारा आणि जावली तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करून शासनाच्या योजनांचा लाभ या दोन्ही तालुक्यांना द्यावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांच्याकडे केली. तशा आशयाचे निवेदनही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांना दिले. यावेळी झालेल्या चर्चेअंती ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांनी सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करून राज्य शासनाकडून तशी यादी जाहीर केली जाईल, अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजेंना दिली.

आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यामुळे सातारा आणि जावली तालुक्यांना न्याय मिळला असून दोन्ही तालुक्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे भीषण दुष्काळाच्या छायेत असेलेल्या सातारा आणि जावली तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

error: Content is protected !!