‘भूमिशिल्प’च्या बातमीची अवघ्या तीन तासांत दखल
नगराध्यक्ष–मुख्याधिकाऱ्यांचे प्रशासनाला तातडीचे आदेश

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) :‘सातारा पालिकेचा कारभार अपारदर्शक’ या मथळ्याखाली ‘भूमिशिल्प’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा तात्काळ परिणाम दिसून आला असून, अवघ्या तीन तासांत पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी बातमीची दखल घेत प्रशासनाला पालिकेची अधिकृत वेबसाईट अद्ययावत करण्याचे तातडीचे आदेश दिले असून, या बातमीमुळे डिजिटल पारदर्शकतेवर उपस्थित झालेल्या गंभीर प्रश्नचिन्हांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. या निर्णायक पावलातून नगराध्यक्षांनी आपल्या पुढील कारभाराची झलक दाखवून दिली आहे.
शासनाच्या सूचनांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांसाठी सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना, सातारा नगरपालिकेच्या sataranp.in या अधिकृत वेबसाईटवर अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती दीर्घकाळ अद्ययावत करण्यात आलेली नसल्याचे सोमवारी दुपारी ‘भूमिशिल्प’ने उघड केले होते. स्थायी समिती इतिवृत्त, निविदा प्रक्रिया, मंजूर कामांची यादी, आर्थिक विवरणपत्र यांसारख्या मूलभूत माहितीचा अभाव असल्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुख्याधिकारी जळक यांनी सोमवारी सायंकाळी तत्काळ सर्व विभागप्रमुखांना लेखी आदेश काढत वेबसाईटवरील माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाशी संबंधित प्रस्ताव, अहवाल, निविदा, आर्थिक माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व विभागांकडून माहिती मागवून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या कामासाठी संगणक विभागालाही विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, ‘भूमिशिल्प’च्या बातमीमुळे प्रशासनावर निर्माण झालेल्या दबावानंतर ही हालचाल सुरू झाल्याने, आतापर्यंतची दीर्घकाळाची निष्क्रियता उघड झाली आहे. अनेक विभागांकडून महिनोनमहिने नव्हे तर वर्षानुवर्षे माहिती अपडेट न झाल्याने नागरिकांना प्रशासनाच्या कामकाजाबाबत अंधारात ठेवले जात होते. आता अचानक सुरू झालेल्या या ‘ॲक्शन मोड’मुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
“वेबसाईटवरील माहिती अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक विभागाची जबाबदारी आहे. यामध्ये झालेल्या त्रुटी गांभीर्याने घेतल्या असून सर्व विभागांकडून तातडीने माहिती मागवली आहे. दोन दिवसांत वेबसाईटवरील आवश्यक माहिती अपडेट केली जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचीही पडताळणी करण्यात येणार आहे.”
- विनोद जळक, मुख्याधिकारी
“पालिका कारभारात पारदर्शकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. नागरिकांना माहितीपासून वंचित ठेवणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. वेबसाईट अद्ययावत ठेवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी.”
- अमोल मोहिते, नगराध्यक्ष
You must be logged in to post a comment.