दोन्ही राजेंच्या विरोधात महाविकास विकास आघाडी पॅटर्न

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे पॅनेल टाकले गेले नव्हते. सातारच्या दोन्ही राजांच्या विरोधात शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असा शब्द श्री. पवारांनी दिल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

सातारा पालिकेच्या निवडणूकीसंदर्भात आज राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी आज पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सातारा पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे पॅनेल टाकण्याबाबत चर्चा झाली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन पालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी दीपक पवार यांनी व्यक्त केली.

सातारा पालिकेतील नेमकी राजकिय स्थिती सांगताना दीपक पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजांच्या विरोधात पक्षाने पॅनेल टाकले नव्हते. तसेच पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत कधीच निवडणूक झालेली नाही. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका निवडणूकीत पॅनेल टाकावे, अशी लोक भावना आहे. लोकांची मागणी असल्याने सध्या अनेक इच्छुक उमेदवार पक्षाशी संपर्क करुन स्वतंत्र पॅनेल टाकावे, अशी मागणी करत आहेत. सातारा शहरातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. पण, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही राजांच्या विरोधात पॅनेल टाकू शकते. त्यासाठी पक्षाने मला परवानगी द्यावी, अशी मागणी दीपक पवार यांनी शरद पवार यांच्या पुढे केली. त्यावर शरद पवार यांनी सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी मी स्वत: बसून चर्चा करेन.

यामध्ये सातारा पालिकेत पॅनेल टाकण्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे सांगितले. सर्व बाबी सकारात्मक असल्याने निर्णय घेण्यास हरकत नाही, पण पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे श्री. पवार यांनी सांगितले. त्यामुळे सातारा पलिकेत दोन्ही राजांच्या विकास आघाडींच्या विरोधात राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीतील घटक पक्षाना सोबत घेऊन पॅनेल पडण्याची शक्यता बळावली आहे.

error: Content is protected !!