सातारा पालिकेला ‘कचरामुक्त शहर’ पुरस्कार दिल्लीत प्रदान

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये सातारा पालिकेला केंद्र शासनाचे कचरा मुक्त शहर म्हणून मानांकन मिळाले आहे. आज दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. हा पुरस्कार सातारा पालिकेच्यावतीने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्विकारला.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये राज्यातील ६९ पालिकांमध्ये साताऱ्यासह जिल्ह्यातील सात नगरपालिकांना थ्री स्टार मानांकन मिळाले. सातारा, कराड, वाई, पांचगणी, महाबळेश्वर, मलकापूर, रहिमतपूर या सातारा जिल्ह्यातील सात पालिकांचा समावेश आहे.

सातारा शहर कचरा कुंड्यामुक्त झाले आहे. तसेच कचरा उचलण्याचे काम नगरपरिषद उत्कृष्टरित्या करीत असल्याने केंद्र सरकारने सातारा शहरास कचरामुक्त शहर म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सातारा शहरात घरगुती कचरा हा विलागिकरण केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो.

या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा माधवी कदम,उपनगराध्यक्षा मनोज शेंडे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी अभिजित बापट ,पालिकेचे सर्व कर्मचारी आणि सातारकर नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा पुरस्कार म्हणजे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पालिकेच्या सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीचे फळ आहे. सर्वांनी मनात घेतल्यानेच आपण इथपर्यंत मजल मारू शकलो असून यापुढील काळात सातारा पालिका अजून उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थानी झेप घेईल.

-मा. मनोज शेंडे, उपनगराध्यक्ष.

error: Content is protected !!