डीपीडीसीतून सातारा नगरपालिकेला मिळाले साडेसात कोटी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुनसातारा पालिकेच्या विविध १६ विकास कामांसाठी सात कोटी ५३ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी तीन कोटी ७६ लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेला वितरीत केला आहे, अशी माहिती भाजपचे खासदार उदनराजे भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र नगरोथ्थान महाअभियानांतर्गत भांडवली मत्तेच्या निर्मितीसाठी अनुदान या उपलेखा शिर्षाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन सातारा नगरपरिषदेस सात कोटी ५३ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी तीन कोटी ७६ लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेला वितरीत करण्यात आला आहे. या निधीतून प्रस्तावित केलेली विकास कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे.

सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत जास्तीत जास्त निधी प्राप्त करुन घेऊन लोकोपयोगी कामे मार्गी लावण्यासाठी सातारा विकास आघाडी नेहमीच प्रयत्नशिल राहिली आहे, असे स्पष्ट करून उदयनराजे भोसले म्हणाले, २०२१-२२ या वर्षातील नियोजन समितीच्या आराखड्यात नगरपरिषदेच्या एकूण १६ कामांचा समावेश करण्यात आला होता. नियोजन समितीमधुन या कामांसाठी तीन कोटी ७६ लाख रुपये नगरपरिषदेस वितरीत करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.

या नगरोथ्थान योजनेमधुन होणारी कामे व निधी मंजूरी अशी आहे. हद्दवाढ झालेला भाग व पूर्वीच्या नगरपरिषदेचे प्रभाग यांचा समतोल साधत ही १६ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या कामांचे कार्यान्वयन जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत होणार आहे. नगरपरिषदेने तयार केलेल्या हद्दवाढ भागातील सुमारे ४९ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडा प्रस्तावातील विकास कामांना देखील लवकरच शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे, असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!