सातारा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सातारा येथील केसरकर पेठेत नवीन करण्यात आलेला रस्ता फोडून विनापरवाना नळ कनेक्शन घेण्यात आले आहे.

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. पालिकेच्यावतीने विनापरवाना नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच अभय दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात निदर्शनास आला आहे. दरम्यान, विनापरवाना नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केसरकर पेठेतील नागरिकांनी निवेदन दिले.

याबाबतची माहिती अशी की ,गेल्या महिन्यात केसरकर पेठेतील दोन व्यक्तींनी येथील रस्ते खोदून पालिकेची कोणतीही परवानगी न घेता पुढील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमधून दोन नळ कनेक्शन घेतले. याबाबत येथील नागरीकांनी नळ कनेक्शन घेणाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पालिकेकडून परवानगी घेऊन कनेक्शन घेत असल्याचे सांगितले. मात्र तेथील नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात चौकशी केली असता याबाबतची कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचं सांगितले. त्यावेळी येथील नागरिकांनी आमच्या नळाला पाणी कमी प्रमाणात येत असून विनापरवाना नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई करावी अशी तोंडी मागणी पालिकेत जाऊन केली होती.त्यावेळी पालिकेकडून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आलं.याबाबत एक महिना होत आला तरी संबंधीतावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही . तेथील नळ कनेक्शन ‘जैसे थे’ च असून पुढील नळांना पाणी अल्प प्रमाणात येत आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. म्हणून बुधवारी येथील महिलांनी पालिकेत जाऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे महिलांनी सांगितले.यावेळी पाणी पुरवठा सभापती सीता हादगे यांना भेटून येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत ते नळ कनेक्शन तोडून कारवाई करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला.त्यांनतर तातडीनं त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिलं.मात्र पालिकेचं पाणी पुरवठा विभाग अशा विनापरवाना नळ कनेक्शन घेऊन बेकायदेशीर पाणी वापरणाऱ्यावर कारवाई न करता त्यांना पाठीशी का घालतंय , त्यांना कोणाचं अभय आहे म्हणून हे धाडस केलं जातंय हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

दरम्यान, बुधवारी पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याने गुरुवारी विनापरवाना नळ कनेक्शन घेेणाऱ्यावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केसरकर पेठेतील नागरिकांनी निवेदन दिले असून संबंधीतांवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

error: Content is protected !!