सातारा पालिकेतील मोठा मासा एसीबीच्या गळाला

सव्वा दोन लाखांची लाच स्वीकारताना उपमुख्याधिकारीच सापळ्यात; अन्य तिघेही ताब्यात
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगर परिषदेकडील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील 15 लाखांची डिपॉझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख 30 हजारांची लाच मागणारा उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ यास उपरोक्त रक्कम स्वीकारताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अँटी करप्शन ब्युरो) पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. पालिकेतील त्याच्याच कार्यालयात सोमवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक आणि या प्रकरणाचे तपासी अधिकारी अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा पालिका उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ (वय 33, रा. केसरकर पेठ, सातारा मूळ रा. रायकर नगर धायरी, पुणे ) याने संबंधित तक्रारदाराकडे सातारा नगर परिषदेकडील कचरा उचलण्याच्या ठेक्यातील 15 लाखांची डिपॉझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख 30 हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार नोंदवल्यानंतर आज सोमवारी पालिका कार्यालयात सापळा रचला. धुमाळ हा संबंधित तक्रारदाराकडून उपरोक्त रक्कम स्वीकारत असताना आम्ही त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
याप्रकरणी आरोग्य निरीक्षक गणेश दत्तात्रय टोपे (वय 43, रा. 322 यादोगोपाळ पेठ, सातारा), आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव (वय 51, रा. धाधमे कॉलनी, करंजे पेठ, सातारा) आणि आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायंगुडे, (रा. 172/2, एसटी कॉलनी पाठीमागे गोडोली, सातारा) या तिघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही शिर्के यांनी दिली.
पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक राजे आणि पोलीस शिपाई काटकर, भोसले, खरात, येवले यांच्या पथकाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे आणि अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली.

हे तर केवळ हिमनगाचं टोक : नरेंद्र पाटील
सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात लाच स्वीकारण्याची घटना घडणे ही सातार्‍यासाठी पर्यायाने लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब आहे. संबंधित पालिका अधिकार्‍याकडून जी काही रक्कम स्वीकारण्यात आली ते केवळ हिमनगाचं टोक आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. पालिकेच्या कारभारावर कसलाच वचक राहिला नसून सातारच्या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे, असेही ते म्हणाले

Attachments area



error: Content is protected !!