सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांना सातारा नगरपालिकेतर्फे दिला जाणारा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
सातारा नगरपालिका व सातारा शहर पत्रकार संघ यांच्यावतीने रविवार दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे सातारा शहरातील पत्रकारांसाठी देण्यात येणार्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
सातारा नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी सातारा शहराच्या पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करत असलेल्या पत्रकारांना थोरले प्रतापसिंह महाराजांच्या नावाने पत्रकारिता पुरस्कार प्रदान केले जातात. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने ही पुरस्कार योजना सातारा नगरपालिकेच्यामार्फत राबवण्यात येते. श्री. छ. उदयनराजे भोसले व सातार्याचे पत्रकार यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांचे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध आहेत. पत्रकारांवरील प्रेमापोटी खा. उदयनराजे स्वत: या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हे पुरस्कार दिले गेले नव्हते. त्यामुळे प्रलंबित पुरस्कारांसह यावर्षीचे असे 29 पुरस्कार देण्यात येणार आहेत. गजानन चेणगे, अजित जगताप, अरुण जावळे, चंद्रसेन जाधव, दीपक शिंदे, उमेश भांबरे, चंद्रकांत देवरुखकर, बबन धनावडे, संदीप राक्षे, ज्ञानेश्वर भोईटे, जयंत लंगडे, सिद्धार्थ लाटकर, संदीप कुलकर्णी, महेंद्र खंदारे, साई सावंत, विशाल पाटील, सचिन काकडे, रिझवान सय्यद, गौरी आवळे, ओंकार कदम, प्रकाश शिंदे, प्रशांत जाधव, प्रशांत जगताप, अमित वाघमारे, पद्माकर सोळवंडे, प्रतीक भद्रे, मनोज पवार, विजय ल्हासुरे, संदीप शिंदे अशा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील पत्रकारांना पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अॅड. डी. जी. बनकर यांच्यासह सातारा शहरातील सर्व पत्रकार उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याला नागरिकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज शेंडे यांनी केले आहे.
You must be logged in to post a comment.