सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय, सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष म्हणून बसवतोय असे सांगून पालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र सत्ताधारी नगरसेवक फक्त टेंडर, टक्केवारी आणि पैसे कमावण्यासाठी नगरसेवक झाले आहेत. हे त्यांच्याच आघाडीचे नगरसेवक आण्णा लेवे आणि दस्तुरखुद्द नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनीच उघड केले आहे. चार वर्षात कधीही खरं न बोललेल्या नगराध्यक्षा कार्यकालाच्या शेवटच्या वर्षी तरी खरं बोलल्या. सातारकरांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडून खरा कारभार जनतेसमोर उघड करणाऱ्या लेवे आणि नगराध्यक्ष मॅडम दोघांचेही अभिनंदन अशा शब्दात विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये टेंडर आणि टक्केवारीसाठी कळवंडी लागतात हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पालिकेत कशाप्रकारे भ्रष्टाचार सुरु आहे हे सत्ताधाऱ्यांनीच दाखवले असून सातारा विकास आघाडीचा खरा कारभार जनतेसमोर आला आहे. सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा काय आहे हे नगराध्यक्ष मॅडम आणि आण्णा लेवे यांनीच उघड केले, याबद्दल त्यांचे सातारकरांच्या वतीने मी अभिनंदन करतो. सत्ताधारी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अण्णा लेवे यांनी जाहीर सभेत कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पाडले. मात्र नगराध्यक्षा सौ.,माधवी कदम यांनी पत्रक काढून सभापतीपदी असताना लेवे यांनी कशी धनलक्ष्मी गोळा केली याचा पाढा वाचला.
सातारा विकास आघाडीत टेंडर आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याचे प्रकार नवीन नाहीत. भ्रष्टाचारावरून आघाडीत तुतूमैंमैं सुरु आहे. लेवे यांनी पालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावेळी नगराध्यक्षांना काहीही सफाई देता आली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी पत्रक काढून सौ. कदम यांनी आघाडीचे नगरसेवक लेवे यांचा सातबारा जनतेसमोर मांडला. दोघांच्या बोलण्यावरून पालिकेत कशाप्रकारे भ्रष्ट कारभार सुरु आहे हे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात कसा भ्रष्टाचार झाला हे लेवे आणि सौ. कदम सांगत आहेत. लेवे यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सौ. कदम यांनी लेवे यांचे कारनामे उघड केले आहेत. लेवे आरोग्य विभागाचे सभापती असताना त्यांनी कसा भ्रष्टाचार केला, कोणते टेंडर कोणाकडे होते, लेवे यांनी कशी धनलक्ष्मी गोळा केली हे जाहीर केले. टेंडर असो किंवा बिले काढणे असो नगराध्यक्षा सौ. कदम यांनी त्यावर सही केली असेलच ना? तसेच टेंडरचे विषय सत्ताधाऱ्यांनी बहुमताचा गैरफायदा घेऊन सर्वसाधारण सभेत मंजूर केले असतील ना. त्यामुळे दोघे एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी, सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचा कसला कारभार सुरु आहे ही वस्तुस्थिती जनतेसमोर आली आहे.
निवडणुकीवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून सातारकरांना भुलवण्यात आले. आघाडीच्या नेत्यांच्या इच्छेनुसार सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष झाली पण, सत्ताधाऱ्यांनी तीला काम पण करून दिले नाही आणि नगराध्यक्षांनी स्वतः पण काहीही करून दाखवले नाही. रंजना रावत या सर्वसामान्य महिलेला सुद्धा नगराध्यक्ष करण्यात आले होते. मात्र चेकवर स्वाक्षरी करत नाही म्हणून नागराध्यक्षांना रजेवर पाठवण्याचा पराक्रम सत्ताधाऱ्यांनी केला होता. राज्यात हा इतिहास साताऱ्यातच घडला. यावरूनच सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांचा किती पुळका आहे हे सिद्ध होते. खरं बोलणाऱ्या सौ. कदम यांचे नशीब चांगले म्हणावे लागेल. सत्ताधाऱ्यांना सातारकरांच्या समस्यांचे, शहराच्या विकासाचे काहीही देणेघेणे नाही. फक्त पैसे कमावण्यासाठीच हे पालिकेत आले आहेत, हे वारंवार सिद्ध झाले आहे. नगराध्यक्षा सौ. कदम आणि नगरसेवक लेवे यांनी त्यांच्या आघाडीचा बुरखा फाडून भ्रष्ट आणि खरा कारभार जनतेसमोर मांडला आहे. सत्ताधाऱ्यांना सातारकरांचे काहीही सोयरसुतक नाही. पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून केवळ पैसा आणि पैसा हा एककलमी कार्यक्रम सत्ताधारी राबवत आहेत, हे सिद्ध झाले आहे, असे मोने यांनी म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.