सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहरातील अनधिकृतपणे लावलेले फ्लेक्स व कापडी बॅनर्स काढून टाकण्याची धडक कारवाई सातारा नगरपरिषदेच्यावतीने करण्यातआली. दोन दिवसात तब्बल तीनशे बॅनर्स काढून जाहिरातीच्या नावाखाली विद्रुपीकरण करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स, कापडी बॅनर्स लावल्याने विद्रुपीकरण होत होते. सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस व सातारा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील फ्लेक्स बोर्ड, कापडी बॅनर्स काढण्याच्या कारवाईला बुधवारी सुरुवात केली. या वेळी शहरातील एसटी स्टॅन्ड, खालचा व वरचा रस्ता, पोवई नाका, भूविकास बॅक, आरटीओ चौक आदी परिसरातील दोन्ही बाजूंचे अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्सवर धडक कारवाई करून हटविले. कायदा सुव्यवस्था व शांतता टिकवण्यासाठी; तसेच खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बुधवारी २२१ तर गुरुवारी ६० फ्लेक्स हटविण्यात आले.
आरटीओ चौकातील फ्लेक्स बोर्ड काढताना पालिका कर्मचारी आणि तेथील एजंट यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर एजंटने कर्मचार्यावर धाव गेल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. येथे झालेल्या झटापटीत पालिका कर्मचाऱ्याला दुखापत झाली. या घटनेची नोंद सातारा पोलीस ठाण्यात करण्यातआली आहे, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांनी दिली आहे.
You must be logged in to post a comment.