सातारा पालिकेत नेमकं चाललंय तरी काय ?

आधी लाच, नंतर कचरा आणि आता मारहाण !
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आधीच कोरोनाचा कहर त्यात पालिकेतील प्रकरणांची भर! रोज-दररोज ऐकावं ते नवलंच! परवा कुणी तरी लाच घेताना सापडतंय, काल कुणी तरी बाहेरचा कचरा आपल्या अंगणात येऊन टाकतंय तर आज कुणी तरी कुणाला पालिका कार्यालयातच हाणतंय… अहो, हे पालिकेत चाललंय तरी काय ? लाच, कचरा आणि मारहाण ही पालिका संबंधित सलग तीन प्रकरणं पाहाता ठेकेदारीचं आणि टक्केवारीचं ग्रहण लागलेल्या सातारा पालिकेला कुणी वाली उरलाय की नाही, असा संतप्त सवाल सातारकरांमधून विचारला जात आहे.  

गेल्या आठ दिवसांपासून सातारा पालिकेतील प्रकरणांची जणू मालिकाच सुरू झाली आहे की काय असं वाटू लागलंय. एक प्रकरण उघडकीस येऊन एक-दोन दिवस उलटत नाहीत तोच दुसरं प्रकरण बाहेर येतंय. ते प्रकरण मिटतंय न मिटतंय तोच तिसरं प्रकरण बाहेर पडतंय.
(प्रकरण पहिले)
‘सातारा पालिकेतील मोठा मासा एसीबीच्या गळाला’
मागच्या सोमवारी म्हणजे 8 तारखेला पालिका उपमुख्याधिकार्‍यालाच लाच घेताना रंगेहाथ पकडलं गेलं आणि पालिकेतील लाचखोरी, टक्केवारी, भ्रष्टाचार याविषयी लोकांमध्ये उघड उघड चर्चा रंगू लागल्या. मग, त्यावरून पत्रकबाजी होऊ लागली. इकडचं पत्रक सातारकरांच्या दारात येऊन पडतंय न पडतंय तोच तिकडचं पत्रकही सातारकरांच्या दारात येऊन हजर! अखेर या पत्रकयुद्धाला (युद्ध कसलं हो, लुटूपुटूची लढाई म्हणा हवं तर त्याला) सातारकर कंटाळल्याचं दिसू लागल्यानंतर दोन्हीकडंच्या पत्रकपाती म्यान झाल्या. सातारा पालिकेच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत एखादा बडा अधिकारी एवढ्या मोठ्या रकमेची लाच स्वीकारताना बहुधा पहिल्यांदाच पकडला गेला असेल पण ही लाचखोरी कुणाच्या सांगण्यावरून घडली, यात आणखी कुणाकुणाचे हात बरबटलेले आहेत याचा शोध घेण्याविषयी इथं कुणाला ना सोयर ना सुतक! पोलीस तपास सुरू आहे ना… मग चालू दे त्यांचं..! यालाच म्हणतात, 
आळीमिळी गुपचिळी 
आम्ही भले नि आमची सत्ता भली..!

(प्रकरण दुसरे)
‘कचरा पुण्याचा, धूर मात्र सातार्‍यात !
शनिवारी पुणे महानगर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाचे दोन कॉम्पॅक्टर बायो मेडिकल वेस्ट कचरा घेऊन सातारा शहरात येतात काय आणि ‘आमचा कचरा तुमच्याकडं, तुमचा कचरा आमच्याकडं’ असं म्हणून कचरा फेकून जातात काय..!  मुळात आपल्या इथल्याच बायो वेस्टचं विघटन करताना नको नको होतंय त्यात दुसरीकडून येणार्‍या वेस्टचं विघटन करण्यात आपण आपली मेहनत आणि वेळ का ‘वेस्ट’ घालवतोय हे समजायला मुळीच मार्ग नाही. आपल्या दारात कचरा फेकणार्‍या पुणे महानगरपालिकेने सातारा पालिकेची परवानगी घेतली होती का तर नाही, संबंधित अधिकारी किंवा प्रशासनास याची पूर्व कल्पना दिली होती का तर नाही मग हा बाहेरच्या जिल्ह्यातला कचरा आपल्या जिल्ह्यात आलाच कसा… बोंबला, याचं उत्तर कुणाकडंच नाही.
बाहेरचा कचरा न घेण्याचा बैठकीत निर्णय 
‘कचरा पुण्याचा, धूर मात्र सातार्‍यात’ या मथळ्याखाली ‘भूमिशिल्प’ने सातारकरांकडून आवाज उठवल्यायांतर  सातार्‍यातील बायो मेडिकल वेस्ट प्रकल्प चालवणार्‍या ‘नेचर इन नीड’ च्या  कदम यांच्यासोबत पालिकेत बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे आदी उपस्थित होते. पालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय बाहेरील कोणत्याही जिल्ह्यातील कचरा आपल्या पालिका हद्दीत घ्यायचा नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


(प्रकरण तिसरे)

नरेंद्र पाटील यांना ठेकेदाराकडून मारहाण परस्परविरोधी तक्रारी पोलिसांत दाखल
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना ठेकेदार गणेश पवार यांनी पालिकेतच मारहाण केल्याची घटना घडली. भर दुपारी हा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ माजली. सातारा शहरातील एका रस्त्याच्या कामावरून झालेल्या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या.सचिन बनसोडे यांच्या फिर्यादीनुसार, नरेंद्र पाटील यांच्याविरुद्ध खंडणी आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा तर नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार गणेश पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून देण्यात आली. 


त्यांचं आपलं एकच, ‘हाताची घडी तोंडावर बोट !’

सातारा पालिकेतील बांधकाम विभागाच्या कार्यालयात शिवसेना पक्षाच्या एका माजी जिल्हाप्रमुखास सर्वांदेखत एका ठेकेदाराकडून मारहाण होते तरी यावर कुणी बोलायला तयार नाही. पालिकेत दिवसाढवळ्या एका नेत्याला मारहाण झाल्याच्या प्रकाराने अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये घबराट पसरली आहे. उद्या आपल्यावर देखील हात उचलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विचाराने ते पुरते भयभीत झाले आहेत. अधिकारी-कर्मचार्‍यांसह पालिकेत येणार्‍या सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते मात्र या प्रकरणी मूग गिळून गप्प आहेत. आज घडलेल्या घटनेनंतर पालिका प्रशासनाकडून दोघांवर काही कारवाई होणार का हे विचारण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता नगराध्यक्षा फोन उचलत नाहीत आणि मुख्याधिकार्‍यांचा फोन स्विच ऑफ सांगतोय. थोडक्यात काय तर पालिकेच्या नगराध्यक्षा आणि पालिका मुख्याधिकारी यावर काहीच भाष्य करायला तयार नाहीत. त्यांचं आपलं एकच ‘हाताची घडी तोंडावर बोट !’


पुण्यातला जैविक कचरा आणून सातारकरांच्या जिवाशी खेळू नका : आ. शिवेंद्रसिंहराजे
महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळत असताना पुण्यातील जैविक कचरा सातारा पालिकेच्या कचरा डेपोमध्ये आणला जातो आणि सातारकरांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार घडतो ही चिंताजनक आणि संताप आणणारी बाब आहे. सातारकरांच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सातारकरांच्या अडचणीत भर टाकण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असा इशारा आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने हा प्रकार थांबवून सातारकरांच्या आरोग्याबाबत सतर्क रहावे, अशी सूचनाही त्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून केली आहे.  




error: Content is protected !!