सातारा : जिल्हा पोलीस दलात तेरा वर्षांपूर्वी भरती झालेल्या ‘टिकू’ श्वानाचे वयाच्या तेराव्या वर्षी सोमवारी निधन झाले. टिकूच्या जाण्याने त्याच्या हँडलरसह पोलीस कर्मचारी भावुक झाले.
सातारा जिल्हा पोलीस दलात टिकू हा जून २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाला होता. निवृत्तीनंतर त्याचा सांभाळ पोलीस हवालदार राहुल आमणे हे करीत होते. टिकू श्वानाने वेळोवेळी गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस दलास मदत केली होती. महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात २ रजत मेडल, कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात ५ सुवर्ण, १ रजतपदक मिळवून दिले होत. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात तीन वेळा टिकू श्वानाचा सहभाग होता. एकूण १७ गुन्ह्यांत घरफोड्या उघड करण्यात टिकूने मोलाची कामगिरी बजावली होती. रविवारी रात्री टिकूने वयाचे १३ वर्षे ९ महिने असताना अखेरचा श्वास घेतला. तपासासाठी सदैव हातभार लावणाऱ्या टिकूच्या निधनाने पोलीस दल हळहळले. टिकूचे निधन झाल्याचे समजताच काही जुन्या सहकाऱ्यांनी मुख्यालयात धाव घेऊन त्याचे अंतिम दर्शन घेतले. या वेळी टिकूने बजावलेल्या कामगिरीला उजाळाही देण्यात आला. सातारा पोलिसांच्या वतीने टिकू श्वानाला अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर श्वान पथकाच्या कार्यालयासमोरच दफन करण्यात आले. या वेळी उपस्थित पोलिसांना निरोप देताना अश्रू अनावर झाले.
You must be logged in to post a comment.