सातारा, ( भूमिशिल्प वृत्तसेवा) : हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०१९ (ALL INDIA POLICE GAMES ) मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या बॉक्सिंग संघातील खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी करून देशात महाराष्ट्र पोलीस दलाची मान उंचावली आहे. महाराष्ट्र पोलीस संघाला सातारा पोलीस दलातील आंतरराष्ट्रीय (एन.आय.एस.) प्रशिक्षक सागर जगताप यांचे प्रशिक्षण लाभले असून महाराष्ट्र संघाच्या यशात जगताप यांच्या रूपाने सातारा पोलीस दलाचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी काढले.
हरियाणा पोलीस अकॅडमी मधुबन येथे अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बॉक्सिंग क्रीडा प्रकारात देशभरातील सर्व राज्यांचे पोलीस संघ आणि पॅरामिलिटरी फोर्सचे संघ अशा एकूण २८ संघांचा सहभाग होता. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करून एक रजत आणि एक कांस्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्र संघाला सातारा पोलीस दलाचे कर्मचारी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप हे प्रशिक्षक होते. खेळाडूंना मार्गदर्शन करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस संघाचे प्रशिक्षक जगताप यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कामगिरीबद्दल ना. शंभुराज देसाई यांनी सागर जगताप यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सातारा जिल्हयांचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बंन्सल उपस्थित होते.
जगताप यांचे सातारा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
You must be logged in to post a comment.