वैवाहिक वादातून तणाव; समुपदेशनातून नवसंजीवनीचा धीर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): पत्नीशी झालेल्या वादातून तणावात गेलेल्या २४ वर्षीय युवकाने थेट अजिंक्यतारा किल्ल्यावर जाऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, योग्य वेळी मिळालेली माहिती, पोलिसांची तत्काळ कारवाई आणि समजूतदारपणाने घेतलेला पुढाकार यामुळे त्याचे प्राण वाचले. सातारा शहर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
शांताराम लक्ष्मण पवार (वय २४, रा. समर्थ नगर, सातारा) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पत्नीशी झालेल्या वादातून मानसिक तणावात गेलेल्या पवार याने अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण दरवाज्याजवळील उंच कड्यावर जाऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता.सायंकाळी चारच्या सुमारास ही माहिती शाहूपुरी पोलिसांमार्फत सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी वेळ न घालवता पीसीआर, बीट मार्शल आणि गुन्हे शाखेच्या डीबी पथकाला तत्काळ घटनास्थळी धाडले.
अजिंक्यताऱ्याच्या कड्यावर सुरू असलेल्या शोध मोहीमेदरम्यान, एक युवक आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन हवालदार सुजित भोसले आणि तुषार भोसले यांनी धाडसाने पुढे जाऊन त्याला ताब्यात घेतले. यानंतर अनिकेत बनकर, महिला पोलीस स्नेहल महाडिक, सुरेश घोडके, सागर गायकवाड यांनी युवकाची समजूत काढून समुपदेशन केले.
दरम्यान, या संवेदनशील क्षणी पोलिसांनी फक्त जीव वाचवण्यापुरती भूमिका निभावली नाही, तर युवकाच्या मनातील भावनिक गुंतवणूक समजून घेत त्याला आधार दिला. अखेर शांताराम पवार यास नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
खाकीतली माणुसकी अजूनही जिवंत आहे!
या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, पोलीस हे केवळ कायदा- सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणारे अधिकारी नसून संवेदनशील समाज रक्षकही आहेत. एक जीव वाचवण्यामागचं हे धाडस, संवेदनशीलता आणि तत्परता निश्चितच प्रशंसनीय आहे.

You must be logged in to post a comment.