अखेर सातारा – रत्नागिरी बस सेवेस सुरुवात

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोनामुळे गेली दोन वर्ष बंद असलेली सातारा-रत्नागिरी ही बस शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता सातारा डेपो मधून धावली. एसटी बसच्या पहिल्याच फेरीला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या अखंड पाठपुराव्याची अखेर आज फलश्रुती झाली.

आज मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून आणि एसटीला हार घालून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सातारा रत्नागिरी ही बस सेवा गेल्या ४० वर्षापासून सातारा आगाराकडून दिली जात होती.सातारा आगारातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या काही बस मार्गांपैकी सातारा रत्नागिरी हा एक मार्ग होता .मात्र करोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्यांच्या एसटी सेवा बंद करण्यात आल्या होत्या.त्यामुळे गौरी गणपतीला साताऱ्यातून कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणस्थ बांधवांची प्रचंड गैरसोय होत होती.

या समस्येचे गाऱ्हाणे कोकण बांधवांनी राजेशिर्के यांच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे घातले . उदयनराजे यांच्या निर्देशानंतर माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी शहराच्या पश्चिम भागातील कोकण बांधवांना घेऊन सातारा जिल्हा आगाराचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना निवेदन सादर केले होते . पलंगे यांनी या मागणीची तत्काळ दखल घेऊन ही बस सेवा तत्काळ सुरू करावी असे आदेश दिले होते . त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता या बस सेवेचा शुभारंभ झाला . या बसला प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती .सातारा रत्नागिरी या बसचे पहिले चालक के. एस.अवकिरे व वाहक एल.एल.मदने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसला हार घालण्यात आला.या कामी सातारा आगाराचे वाहतूक नियंत्रक मंगेश लाड यांचे मोठे सहकार्य लाभले.

दरम्यान,सातारा-रत्नागिरी ही बस सव्वा सात वाजता सुटून दुपारी साडेबारा वाजता रत्नागिरीत पोहोचणार आहे व पुन्हा रत्नागिरी आगारातून अडीच वाजता सुटून सायंकाळी साडेसात वाजता ती पुन्हा सातारा आगारात येणार आहे.

बस सेवा सुरू केल्याबद्दल सुहास राजेशिर्के यांनी सातारा आगाराचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे, वाहतूक व्यवस्थापक ज्योती जाधव, वाहतूक नियंत्रक मंगेश लाड यांचे आभार मानले आहेत.

खा. श्री . छ.उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनामुळेच ही बस सेवा सुरू झाली याचा मला मोठा आनंद आहे .साताऱ्यात स्थायिक झालेल्या कोकणस्थ बांधवांना गौरी गणपतीसाठी मिळालेली बससेवा फार मोलाची आहे . हा मार्ग सातत्याने नफ्यामध्ये राहून या बस सेवेला आणखी कोणकोणत्या सुविधा देण्यात येतील यासाठी सातत्याने पाठपुरावा करेन.

-: मा. सुहास राजेशिर्के, माजी उपनगराध्यक्ष, सातारा नगरपरिषद, सातारा.

error: Content is protected !!