सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्री. छ.खा.उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली सातारा – रत्नागिरी बससेवा एक सप्टेंबर पासून सुरू करण्याचे लेखी आदेश सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिले आहेत.
सातारा शहरांमध्ये स्थायिक झालेल्या कोकणातील बांधवांना सातारा-रत्नागिरी बस नसल्यामुळे गौरी गणपतीसाठी त्यांच्या गावी जाण्याची अडचण होत होती. ही अडचण ओळखून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे सुहास राजेशिर्के यांनी नुकतीच विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले होते. यावेळी निवेदनाची पलंगे यांनी सकारात्मक दखल घेत तत्काळ ही सेवा सुरू केले जाईल असे आश्वासन दिले होते. सुहास राजेशिर्के यांच्या पाठपुराव्यानंतर अवघ्या पाच दिवसात रोहन पलंगे यांनी सातारा आगार व्यवस्थापकांना सातारा-रत्नागिरी बससेवा सुरू करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
विभाग नियंत्रक पलंगे यांनी सातारा आगाराच्या व्यवस्थापकांना दिलेल्या आदेशात एक सप्टेंबर पासून सातारा येथून रत्नागिरीला जाण्यासाठी बससेवा सुरू करावी.त्याकरिता दोन वाहक व दोन चालक यांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदर फेरीचा प्रवास ४४८ किलोमीटर होणार आहे तसेच सदर मार्गावरील बसचे आरक्षण तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही आदेशात दिल्या आहेत.या बसचे आगाऊ आरक्षण दिनांक २७ ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे.
दरम्यान ,विभाग नियंत्रक श्री.पलंगे यांनी सातारा रत्नागिरी बस सुरू केल्याची आदेशाची प्रत सुहास राजेशिर्के यांना दिली. सुहास राजेशिर्के यांनी ही प्रत खासदार उदयनराजे भोसले यांना सादर करून त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, विजय बडेकर, विनायक गोरे, संजय आवकीरकर उपस्थित होते.
सातारा शहरातील मूळच्या कोकणवासीयांना या बससेवेमुळे मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी सुहास राजेशिर्के यांना धन्यवाद दिले आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा सातारा रत्नागिरी बस सेवा उपलब्ध करण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल सुहास राजेशिर्के यांचे अभिनंदन केले आहे.
तत्काळ बस सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल विभाग नियंत्रक रोहन पलंगे, आगार व्यवस्थापक ज्योती जाधव यांचे सुहास राजेशिर्के यांनी आभार मानले आहेत .
You must be logged in to post a comment.