सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेने सातारा आणि जावली तालुक्यातील दुर्गम शाळा घोषित करताना शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तीन निकष न लावता चार निकष लावले आहेत. शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तीन निकष लावावेत तसेच मंडल निहाय पर्जन्यमान गृहीत धरावे, वाहतूक व्यवस्थेबाबत फेर सर्व्हे करावा यांसंदर्भाने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याशी चर्चा केली. गौडा यांनी सर्व सूचना मान्य करून लवकरच बदल करण्याचे जाहीर केल्याने सातारा- जावली तालुक्यातील दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला आहे.
सातारा जिल्हा परिषदेने सातारा तालुक्यातील १० तर जावळी तालुक्यातील १८ दुर्गम शाळांची यादी घोषित केलेली आहे. याला अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता. दुर्गम शाळा घोषित करताना चार निकष लावण्यात आले असून शासनाच्या अध्यादेशानुसार तीन निकष लावून दुर्गम शाळांची वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे हि समस्या सोडवा अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आज जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी गौडा यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. यावेळी दीपक भुजबळ, सुरेश जेधे, रघुनाथ दळवी, अनिल चव्हाण, शंकर देवरे, शंकर जांभळे, सुजाता जाधव, तानाजी आगुंडे, सुरेश चिकणे, गणेश शिंदे, धनसिंग सोनावणे, नामदेव जुनघरे, विजय बांदल, संजय कटाळे, जोतिराम जाधव, महेश पडलवार, विकास ढाणे, घनश्याम कदम, सखाराम मालुसरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या मागणीनुसार मंडल निहाय पर्जन्यमान गृहीत धरावे, वाहतूक व्यवस्थेबाबत फेर सर्व्हे करावा, दुर्गम शाळा ठरवताना चार ऐवजी शासनाच्या अध्यादेशानुसार तीन निकष लावावेत असे, आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. यावर गौडा यांनी सकारात्मकता दर्शवून शिक्षकांच्या मागणीनुसार बदल करू, असे सांगितले. यामुळे दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला असून शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि शिक्षकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि विनय गौडा यांचे आभार मानले
You must be logged in to post a comment.