सातारा-सांगली ही जिद्दी व्यक्तिमत्त्वांची भूमी : प्रा. नागनाथ स्वामी

‘चंदू चॅम्पियन्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या कार्याचा वडूजमध्ये गौरव

वडूज,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महत्वकांक्षेला प्राधान्य देत आपल्या स्वप्नांना साकार करण्याची जिद्द सातारा -सांगलीच्या भूमीमध्ये आहे. म्हणूनच एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीने बालपणी पाहिलेले देशाला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न साकार झाले व पद्मश्री पुरस्काराने हे त्यांचा सन्मान झाला, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व ग्राहक राजा संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. नागनाथ स्वामी यांनी व्यक्त केले.

मोरगिरी, ता. पाटण, आणि वडूज, ता. खटाव या परिसराशी विशेष जिव्हाळा असलेले मूळचे इस्लामपूर येथील रहिवासी व स्वातंत्र्यसैनिक राजारामबापू पेटकर यांचे चिरंजीव पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या क्रीडा क्षेत्रातील जिद्दी प्रवासावर आधारित चंदू चॅम्पियन्स या चित्रपटाच्या वडूज येथील प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन उमाजी पवार, पत्रकार जयंत लंगडे, टेलरिंग व्यावसायिक मिलिंद लंगडे, गायक नितीन लंगडे आणि श्री. पेटकर यांच्या कार्याचा आदर असलेले वडूज परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

हिंदीतील नामवंत दिग्दर्शक कबीर खान यांनी दिग्दर्शन केलेला व साजिद नाडियाडवाला यांनी निर्मिती केलेला कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेला “चंदू चॅम्पियन” हा चित्रपट समाजाला नवी दिशा देईल आणि त्या माध्यमातून मुरलीकांत पेटकर या जिद्दी माजी सैनिक व जलतरणपटूचा जीवन प्रवास संपूर्ण समाजास माहीत होईल, अशी अपेक्षाही प्रा.स्वामी यांनी यावेळी व्यक्त केली.

कॅप्टन उमाजी पवार म्हणाले की, इस्लामपूर येथील एका मुलाला कुस्तीपटू व्हायचे होते, परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे व्यायामासोबत तो स्थानिक पैलवानांसाठी थंडाई करून उरलेली स्वतः पित असे.एके दिवशी एका पैलवानाने त्याला थंडाई पिताना पाहिले आणि त्याच्यासाठी व्यायामशाळेचे दरवाजे बंद झाले. तो अपमान त्याला सहन नाही झाला आणि त्याने गाव सोडलं, देशाला क्रीडा क्षेत्रातील सुवर्णपदक मिळवून मगच गावी परत येणार, असा निर्धार करत तो पुण्याला गेला आणि सैन्यात भरती झाला आणि तिथे त्याने बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीही शिकली व जी कर्तबगारी दाखवली, त्याचा सविस्तर वृत्तांत या चित्रपटात आहे.

प्रस्ताविकामध्ये जयंत लंगडे म्हणाले की, १९६५ च्या सियालकोट युद्धात पेटकर यांना ९ गोळ्या लागल्या होत्या. उपचारावेळी सर्व गोळ्या काढल्या गेल्या, पण पाठीच्या कण्यातली एक गोळी काढणे अशक्य होते. त्यामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी वत्यानंतर पायात शक्ती येण्यासाठी त्याने पोहण्याचा सराव केला. नंतर विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील २९१ सुवर्ण पदके,१९५ रौप्य पदके आणि ८९ कांस्य पदके जिंकली. त्यांच्या गौरवार्थ चेन्नईतील एका जलतरण तलावला त्यांचे नाव देण्यात आले आहे. नामदेव शिंपी समाजातील ते पहिले पद्मश्री असल्याचा आम्हास अभिमान वाटतो.

नितीन उर्फ बंटी लंगडे म्हणाले की, मोरगिरी येथील रामचंद्र सीताराम हिरवे यांचे आवडते व लाडके भाचे म्हणजे मुरलीकांत पेटकर. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव व पेठ येथील माणकेश्वराचे ते परमभक्त आहेत. ते आमच्या आईचे आत्येभाऊ असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. जर्मनीमध्ये हेडेल्बर्ग येथे १९७२ साली झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला सर्वप्रथम सुवर्णपदक मिळवून दिले. नातेवाईक व समाजातील अनेकांसाठी ते आधारवड आहेत. त्यांचे जीवन कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.

यावेळी कॅप्टन उमाजी पवार यांच्यासह माजी सैनिक व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. श्रीफळ वाढवून व सिनेमा हॉलच्या पडद्याचे पूजन करून “भारत माता की जय”च्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणून सोडण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीबरोबरच चित्रपटगृहमालक अनुप जगदाळे यांच्या सहकार्याबद्दल मिलिंद लंगडे यांनी आभार मानले.

यावेळी सौ. शीतल लंगडे, सौ. मधुरा लंगडे, सौ. लीना लंगडे यांनीही मनोगते व्यक्त केली व पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या बाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

error: Content is protected !!