डॉल्बी नकोच…साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार!

प्रशासनाला निवेदन; ठोस निर्णय न घेतल्यास निषेध रॅलीचा इशारा

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : गणेशोत्सवात तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या वाढत्या आणि अमर्याद वापरामुळे त्रस्त झालेल्या सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी आता थेट आवाज उठवला आहे. ‘समर्थ ज्येष्ठ नागरिक संस्था’ तसेच शहरातील अन्य काही ज्येष्ठ नागरिक संघटनांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाच्या विरोधात ठोस भूमिका घेतली असून, डॉल्बीवर बंदी न आल्यास रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, गणेशोत्सवाच्या काळात तसेच अन्य प्रसंगी डॉल्बीचा अमर्याद वापर होतो. परिणामी, शहरात ध्वनीप्रदूषण वाढते. आवाज इतका प्रचंड असतो की, त्याचा थेट परिणाम वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यावर होतो. कानठळ्या बसतात, झोपमोड होते, हृदयविकाराचे रुग्ण अस्वस्थ होतात, आणि वातावरणातील शांतता पूर्णपणे भंग होते.

अलीकडेच शाहू कला मंदिर येथे झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत डॉल्बीचा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, त्या बैठकीत डॉल्बीवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले गेले नाहीत, याबद्दलही निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काही ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्तपणे डॉल्बी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु सातारा शहरात डॉल्बीला ‘मर्यादित आवाजात वापरण्याची’ परवानगी दिली गेल्याचे प्रशासनाचे धोरण खटकत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केले.फक्त गणेशोत्सवच नव्हे, तर वाढदिवस, लग्न सोहळे, मिरवणुका, तसेच राजकीय कार्यक्रमांतही प्रचंड आवाजात डॉल्बी, फटाके आणि मोठ्या स्पीकर्सचा वापर होत असल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

लहान मुले, रुग्ण, वयोवृद्ध नागरिक यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फक्त डॉल्बी नव्हे, तर ध्वनिप्रदूषण निर्माण करणाऱ्या सर्वच साधनांवर कठोर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा, ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या वतीने सातारा शहरात निषेध रॅली काढण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शांततेसाठी ही भूमिका घेतली जात असून, डॉल्बी विरोधातील ही लढाई म्हणजे ‘स्वस्थ आयुष्यासाठीचा आवाज’ असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!