सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या सेतू कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या तक्रारीची चौकशी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केली आहे. या चौकशीच्या अहवालात तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेल्या त्रुटी, नोंदी आणि आर्थिक उलाढालीतील अनियमिततेवर बोट ठेवण्यात आले असून हा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिला आहे. आता या अहवालानुसार जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून, शासन नियमांचे उल्लंघन करत विविध प्रकारचे दाखले, प्रतिज्ञापत्रे ऑफलाइन देण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. तसेच पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती सविस्तर तपशील घेऊन याबाबत जोरदार आवाज उठवत कारवाईची मागणी केली आहे .
विविध दाखले, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आदी सुविधा सेतू कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येतात.मात्र प्रतिज्ञापत्रासाठीचे आकारण्यात येणारे शासकीय शुल्क शासकीय खजिन्यात जमा न करता संबंधित कंपनीने स्वत:कडेच ठेवल्याची माहिती कागदपत्रांच्या पडताळणीतून समोर आली. यामुळे सेतू चालविणाऱ्या सार. आय. टी रिसोर्सेस या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार श्री. सोळवंडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी श्री.डूडी यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांना दिल्या होत्या. यानुसार त्यांनी चौकशी करत तक्रार अर्जातील सर्व मुद्द्यांनिहाय अहवाल नुकताच श्री. डूडी यांना सादर केला आहे. या अहवालात तक्रार अर्जातील प्रत्येक मुद्दे बरोबर असल्याचे व प्रत्येक बाबीत शासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रांतांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी श्री. डूडी काय कारवाई करतात, याकडे आता नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान ,वर्षभर करारानुसार ऑनलाईन प्रतिज्ञापत्रांची नोंद न करता ऑफलाइन प्रतिज्ञापत्रे देऊन शासकीय महसूल बुडवणाऱ्या आणि सरकारी पैसे खासगी कारणांसाठी वापरणाऱ्या ठेकेदारांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कर्तव्य पालनात कुचराई केल्याची कारवाई व्हावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी श्री. सोळवंडे यांची मागणी आहे.तसेच सर्वसामान्य जनतेतूनही हीच भावना व्यक्त होत आहे. तर माहिती अधिकारांमध्ये दिलेली माहिती प्रांताधिकार्यांचा अहवाल यामध्ये आकडेवारी मध्ये असलेल्या विसंगतीमुळे या प्रकरणाबाबतची साशंकता आणखी वाढली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडे असलेल्या अन्य तालुक्यांमधील सेतू ठेक्यांबाबतही अनियमितता उघडकीस येणार असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.
तक्रारीनंतर १० लाख ३७ हजार महसूल जमा
पत्रकार पद्माकर सोळवंडे यांनी सातारा सेतू कार्यालयाच्या गैरकारभाराबाबत केलेल्या तक्रारीनंतर ३० हजार ८७१ प्रतिज्ञापत्रांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद करण्यात येऊन १० लाख ३७ हजार २६५ रुपये महसूलरूपी जमा झाले आहेत. वास्तविक ऑनलाइन नोंदी करण्यासाठीं ‘सर्व्हर डाऊन’चे कारण सांगणारांनी वर्षभर शासकीय रक्कम वापरल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे .
You must be logged in to post a comment.